नागपूर : सध्या राज्यात मान्सून सक्रिय असल्यामुळे बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली आहे. परंतु १८ जुलै पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्यास सुरवात होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
23जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात सार्वत्रिक व दमदार पावसाची शक्यता नसल्यामुळे काही भागातच हलका पाऊस पडेल. दरम्यान पावसाचे प्रमाण कमी होणार असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होईल.
23 ते 25 जुलैमध्ये विदर्भात परत एकदा पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची काही शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील बऱ्याच भागातील पावसात दीर्घकालीन खंड पडण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. कोकण आणि मुंबई परिसरातदेखील या आठवड्यात पावसाचा जोर कमी राहील. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.