नागपूर : मल्टिप्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या आवाजावी किंमतींना चाप बसावा यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज (ता. 13) घेतला. आता प्रेक्षक बाहेरील खाद्य पदार्थही मल्टिप्लेक्समध्ये घेऊन जाऊ शकतात. बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास आता बंदी नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकारला फटकारल्यानंतर आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती विधान परिषदेत दिली.
राज्यातील कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील पदार्थ घेऊन जाण्यास मनाई केली, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
तसेच 1 ऑगस्ट पासून एकाच वस्तूची एमआरपी ही दोन ठिकाणी वेगवेगळी नसेल. सर्व ठिकाणी एमआरपी ही सारखीच असायला हवी, जागा बदलली म्हणून वस्तूची ‘एमआरपी’ बदलू शकत नाही, अशीही माहिती चव्हाण यांनी दिली.
मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतींबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.
राज्यातील विविध महानगरांमधील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर त्यावर कारवाई होणार आहे, तसेच 1 ऑगस्ट पासुन खाद्यपदार्थांच्या किंमतीची एकच एमआरपी राहणार आहे. याबाबत मी आज #नागपूर_अधिवेशन मध्ये लक्षवेधी उपस्थित केली होती pic.twitter.com/uAVmgJXJsL
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 13, 2018
मल्टिप्लेक्समधील महागाईच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हेही मागे घेतले जातील, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले. तसेच, खाद्यपदार्थांच्या किंमतींबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अधिवेशनानंतर बैठक घेतली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
अधिक वाचा : राज्यातील जनतेच्या मनात आनंद निर्माण करण्यासाठी नवीन मंत्रालय