नागपुर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नागपुर मध्ये रविवारी आगमन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली प्रदीर्घ काळ कारागृहात काढल्यानंतर भुजबळ बाहेर आलेले आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता त्यांचे नागपुरात आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आगमनानंतर त्यांनी विमानतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. नंतर त्यांचे छोटेखानी भाषण झाले विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, नवी मुंबईतील वादग्रस्त सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोपात तथ्य नसल्याचा कांगावा करीत आहेत.
मुख्यमंत्रीच विषयाच्या अनुषंगाने सभागृहात निवेदन करीत असून त्यांनीच कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाणी कुठेतरी मुरत आहे. छगन भुजबळ फुले पगडी घालून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या विदर्भातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले.
यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे मत नोंदविले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मंत्री सांभाळावे लागत असतानाच सिडकोप्रकरणी मुख्यमंत्री वकिली पणाला लावून विरोधकांना उत्तरे देत आहेत. सभागृहात मांडण्यात येणारा प्रत्येक मुद्दा वेगवेगळ्या समाजघटकांसाठी महत्त्वाचा असतो. मात्र, सत्ताधारी त्यांना थातूरमातूर उत्तरे देऊन कारवाई टाळतात. सरकारची कोंडी करायला शेतकरी, कामगार, ओबीसी विद्यार्थ्यांसह अनेक प्रश्न आहेत. पण, सभागृहात बोलायला बंधने येतात. किती बोलायचे, काय बोलायचे, याला वेळेचे बंधन असते. अनेकदा खरे उत्तर वा कारवाई टाळली जाते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हे विषय जनतेपुढे नेले पाहिजे.
विरोधकांतर्फे मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांचे समर्थन करतानाच आपलाही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न राहील, असे भुजबळांनी स्पष्ट केले. आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री रमेश बंग प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते. त्यांची एरवी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भुजबळ पावसाळी अधिवेशनात कसा करिश्मा दाखतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : मालमत्ता सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा – कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव यांचे निर्देश