नागपूर :- नागपूर शहरात गुरुवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने संपूर्ण शहरात पाणी साचले आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरातील या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमातीत असलेल्या ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ला भेट देऊन परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली. जेथे आवश्यक आहे, त्या सर्व ठिकाणी तातडीने मदत पोहोचवावी, आपत्ती व्यवस्थापानाचे कार्य चोखपणे बजावण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी त्यांचेसोबत महापौर नंदा जिचकार, मनपाचे स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेसी, प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान) एस.पी.आर. श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पावसामुळे झालेल्या नागपूर शहराच्या परिस्थितीची माहिती घेतली. नागपूर शहरात लागलेल्या तीन हजारांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील परिस्थितीची माहिती सिटी ऑपरेशन सेंटरला मिळत असते. विमानतळ, हॉटेल प्राईडसमोरील परिसर, पोहरा नदीमुळे सोनेगाव पोलिस ठाणा परिसरात आणि वर्धा रोडवरील घरांत शिरलेले पाणी, पडोळे चौक, पारडी चौक, ऑटोमोटिव्ह चौक आदी ठिकाणची त्यांनी माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे शहरातील परिस्थिती गंभीर असून संपूर्ण यंत्रणा २४ तास कर्तव्यावर ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. नदीकाठावर असलेल्या नागरिकांना धोक्याची सूचना देऊन तातडीने हलविण्याचे निर्देश त्यांनी दिली. शाळा, समाजभवन तयार ठेवा. सर्व ती मदत आणि सहकार्य करा, असेही निर्देश त्यांनी दिले. आपतकालिन यंत्रणा संपूर्ण शहरात मदत कार्य करीत असून जेथून नागरिकांची मागणी आली तेथे तातडीने मदत पाठविली जात असल्याची माहिती मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.
स्मार्ट सिटीची घेतली माहिती
यानंतर प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. सदर बैठकीत स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी स्मार्ट सिटीच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत होत असलेल्या पारडी, भरतवाडा, पूनापूर परिसरासाठी तयार करण्यात आलेल्या शहर नियोजन आराखड्याची माहिती दिली. हा आराखडा नागरिकांसाठी प्रसिद्ध केल्यानंतर यावर १९८ हरकती व सूचना आल्या. त्यातील १९३ हरकतींचा निपटारा केल्याची माहिती डॉ. रामनाथ सोनवणे यांनी दिली.
अधिक वाचा – फोटो: स्मार्टसिटी नागपूर पाण्यात.. रस्त्यावर गुढघाभर पेक्षा जास्त पाणी
अधिक वाचा – फोटो: स्मार्टसिटी नागपूर पाण्यात.. रस्त्यावर गुढघाभर पेक्षा जास्त पाणी