नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभांरंभ महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी प्रत्येकी झाड लावून केला. राज्य शासनाने सुरू केलेल्या महावृक्षारोपण मोहिमेला आजपासून सुरूवात झाली. त्याअंतर्गत महानगरपालिकेद्वारे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन सिव्हिल लाईन्स स्थित ऑल सेंट कैथड्रल चर्च परिसरात करण्यात आले होते. शहरातील प्रत्येक प्रभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी एकूण १४६३ झाडे लावली.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त अजीज शेख, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी, नेचर कन्झरव्हेशनचे श्रीकांत देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी वृक्षारोपण करण्याचे महत्व विषद करीत, प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवावे असा संदेश देत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची शपथ दिली. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शहरातील पर्यावरण प्रेमी संघटना, समाजसेवी संस्थानी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
नागपूर महानगरपालिकेद्वारे आज शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. डॉ.हेडगेवार लाईब्ररी व उद्यानात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी बारसेनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी दर्शन कॉलनी उद्यानात वृक्षारोपण केले. लक्ष्मीनारायण मंदिर उद्यानात जैवविविधता समितीच्या सभापती दिव्या धुरडे, नगरसेवक हरिश दिकोंडवार यांनी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती यांनी रवीनगर उद्यानात, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे यांनी लता मंगेशकर उद्यानात , आशीनगर झोन सभापती वंदना चांदेकर यांनी वैशालीनगरातील तथागत बौद्ध विहार परिसरात, मनपाच्या उपनेत्या वर्षा ठाकरे यांच्या हस्ते अंबाझरी उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. सी.पी.क्लब येथे ग्रीन व्हिजील संस्था आणि रोटरी कल्ब यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय शहरातील ३८ प्रभागांमध्ये वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली.
महर्षी दयानंद पार्क येथे साकारणार तुळशी उद्यान : वीरेंद्र कुकरेजा
उत्तर नागपूरच्या हॄदयस्थळी सहा एकरात असलेल्या जरीपटका स्थित दयानंद पार्क येथे स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उद्यान परिसरात अशोका, निलगिरी, निम, आपरा, तुळशी, कडुलिंब या जातीचे १५० झाडे लावण्यात आले. दयानंद पार्क जवळील बॅडमिंटन हॉलच्या बाजुला तुळशी उद्यान तयार करण्यात आले असून या संपूर्ण उद्यानात तुळशीचे विविध प्रकारचे १०० रोपटे लावण्यात आले आहेत. या ठिकाणी बफे योगा क्लब, डी.पी.योगा कल्ब तर्फे नियमित योग प्रशिक्षण दिले जाते. या तुळशी उद्यानातून प्राणवायू मिळणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांनी कौतुक केले आहे.
यावेळी दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला मंथरानी, नगरसेविका सुषमा चौधरी, योग शिक्षक राजू सचदेव, लालचंद केवलरामानी, प्रीतम मंथरानी, महेश मेघाणी, अर्जून गंगवानी, विलास गजभिये, मुरवी कुंभवानी, अनिल पमनानी, संजय अंबादे, प्रीतम भोजवाणी, राकेश वाघवाणी, हरिश हेमराजानी, मंजू गंगवाणी, राजकुमारी अजवाणी, घनश्याम गोहाणी, सुधीर मेश्राम, सत्यवान साखरे, संजय चौधरी, जीवन मेश्राम, उद्यान निरिक्षक अनंत नागमोते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
अधिक वाचा : महाराष्ट्र कृषी दिन : महाराष्ट्र सरकारचे शेतीविषयक धोरण आणि शेतीसाठीच्या योजना