नागपूर : जूनमध्ये बॅकलाॅगवर असलेल्या पावसाने जुलैमध्ये मात्र सरप्लस मुसंडी लावली. ३० जूनपर्यंत केवळ १२७ मिमी पावसासह ४१ टक्के कमतरता नाेंदविली हाेती. मात्र, जुलैमध्ये आतापर्यंत ८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. १० जुलैपर्यंत विदर्भात सरासरी २६६.९ मिमी पाऊस हाेताे; पण यावेळी आतापर्यंत २८८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचे सत्र रविवारीही कायम हाेते. अकाेला, अमरावती वगळता विदर्भात सर्वत्र पावसाने जाेरात धडक दिली. गडचिराेलीच्या मुलचेरा भागात २०५.८ मिमी अशा विक्रमी पावसाची नाेंद करण्यात आली. गडचिराेलीत २४ तासांत ४४ मिमी पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यात सावनेर तालुक्यात सर्वाधिक ६४.६ मिमी पाऊस नाेंदविला गेला. शहरात १८ मिमी पावसासह २४ तासांत ३४.४ मिमी पावसाची नाेंद झाली. दमदार पावसाने नदीनाल्यात जलसाठा वाढला आहे. गाेंदिया शहरात दिवसा ५२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूरमध्ये दिवसा २० मिमीसह २४ तासांत ७२.६ मिमी पाऊस नाेंदविला गेला. रविवारी सकाळपर्यंत चंद्रपूरच्या मूल येथे १०२.५ मिमी पावसाची नाेंद झाली. यवतमाळच्या राळेगावला १०५ मिमी, तर अमरावतीच्या धामणगाव येथे ५७.२ मिमी पाऊस झाला. वर्ध्यात दिवसा १३ मिमी पावसासह २४ तासांत १२१.४ मिमी पावसाची नाेंद झाली.
हवामान विभागाने १२ जुलैपर्यंत जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार विविध जिल्ह्यांत ठिकठिकाणी पावसाने वेग घेतला आहे. सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी, रोवणीची कामे वेगाने चालविली आहेत. विभागाने सोमवारीही पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर १३ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टसह मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. काही हवामान तज्ज्ञांच्या मते, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात २२ जुलैपर्यंत पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे.