पुणे: आपल्या अभिनयाने आणि सुरेल गायनाने संगीत रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका कीर्ती शिलेदार(kirti shiledar) यांचे आज (शनिवार) निधन झाले. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने संगीत नाटकांना वेगळ्या उंचीवर नेले.
आपल्या आई जयमाला आणि वडील जयराम शिलेदार यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे अनेक प्रयोग झाले. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले.
संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार(kirti shiledar) यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्व यांच्या सुवर्णयुगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा अनेक वर्षे अविरतपणे केली.
मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार ठरल्या. एकच प्याला, कान्होपात्रा, द्रौपदी, मानापमान, ययाति आणि देवयानी, शाकुंतल, संशयकल्लोळ, सौभद्र अशा संगीत नाटकांत त्यांनी काम केले. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.