मुंबई, राज्यभरात लागू असलेले कठोर निर्बंध आणखी 15 दिवस कायम ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी केली. राज्यातील प्रादुर्भाव जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असून, प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांत परिस्थितीनुसार निर्बंध शिथिल केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
राज्यात निर्बंध लागू असले, तरी अर्थचक्र सुरू राहायला हवे, यासाठी देखील काही उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले. कोरोनामुक्त घर, कोरोनामुक्त गाव हा संकल्प आपण करायला हवा. यामुळेच गाव, शहर, तालुका, जिल्हा आणि पर्यायाने राज्य कोरोनामुक्त होऊ शकते. याच अनुषंगाने आपण उद्या सोमवारपासून कोरोनामुक्त गाव ही मोहीम हाती घेत आहोत. हिवरेबाजार, घाटणे ही गावे कोरोनामुक्त झाली, अशी माहिती त्यांनी दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाधितांच्या संख्येने शिखर गाठले होते. आता बाधितांची संख्या कमी झाली, पण पाहिजे तशी खाली आली नाही. निर्बंध लादण्याची इच्छा नाही, पण राज्याच्या हितासाठी कटू निर्णय घ्यावे लागतात. पूर्वी बरे होण्याचे प्रमाण 78 टक्के होते, आता 92 टक्के आहे. त्यावेळी टाळेबंदी होती आणि आता फक्त निर्बंध आहेत, असे ते म्हणाले.
अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारणार
कोरोनामुळे अनेक मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हिरावले गेले. असंख्य बालके अनाथ झाली. या सर्व बालकांचे पालकत्व राज्य सरकार स्वीकारेल. या अनाथ बालकांना शिक्षण, राहण्याची व्यवस्था यासह जिथे जिथे जे काही शक्य असेल, तिथे ती सर्व व्यवस्था करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
तिसरी लाट आल्यास मुलांची काळजी घ्या
देशात, राज्यात तिसरी लाट आल्यास आपल्या घरातील लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग व्हायला नको, याची काळजी ज्येष्ठ नागरिक आणि घरातील इतर सदस्यांनीच घ्यायची आहे. या लाटेचा फटका जर लहान मुलांना बसला, तर राज्यात आतापासून बालरोगतज्ज्ञांचे कृती दल सज्ज ठेवले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दहावीची परीक्षा होणार नाही
राज्यात दहावीची परीक्षा कुठल्याही स्थितीत होणार नाही. नववी आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षांच्या आधारावर मूल्यमापन करून, गुण दिले जाणार आहे, असे सांगताना त्यांनी बारावीच्या परीक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. बारावी परीक्षेवरच पुढचे उच्च शिक्षण अवलंबून असते, त्यामुळे केंद्राने एकच सर्वंकष शैक्षणिक धोरण ठरविण्याची गरज आहे. तशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार आहो. शिक्षण सुरू राहायलाच हवे, यासाठी क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरज आहे. वर्क फ्रॉम होमप्रमाणेच शिक्षणासाठी काही करता येईल का, यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
चक्रीवादळातील नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज
चक्रीवादळातील मदतीबाबतचे निकष बदलण्याची वेळ आली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदत ठरवली जाते. दरवर्षीच चक्रीवादळ येत आणि नुकसान होते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये भूकंपरोधक घरे बांधण्याचा, विजेचे खांब कोसळणार नाही, वीज खंडित होणार नाही, यासाठी भूमिगत विजेच्या तारा देण्याचा पर्याय समोर आहे. केंद्र सरकार यात आपल्याला नक्कीच मदत करेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.