प्रेयसीला वाचवण्यासाठी तरूणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तमिळनाडुतील रामनाथपुरम येथे घडली. प्रेयसीच्या घरच्यांनी प्रेमविवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय इंजीनिअरिंग करत असताना त्याची अपर्णासोबत ओळख झाली. मैत्री आणि नंतर प्रेम झाले. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विजयला नोकरी मिळाली. त्यासाठी तो चेन्नईला आला.
काही दिवसांनी विजयला त्याच्या मित्रांकडून समजले की, अपर्णाच्या कुटुंबीयांना तिच्या रिलेशनशिपबद्दल समजले असून तिचा फोन जप्त केलाय. त्यानंतर विजय अपर्णाच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी पोहोचला. मात्र अपर्णाच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला.
त्यानंतर विजयने अपर्णाच्या घरच्यांना एका आठवड्याचा वेळ दिला आणि पुन्हा लग्नाच्या परवानगीसाठी येईल असे सांगितले. यादरम्यान अपर्णाच्या घरच्यांनी कराईकुडी महिला पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. गेल्या शनिवारी विजय पुन्हा लग्नाच्या मागणीसाठी अपर्णाच्या घरी आला. त्यावेळी अपर्णाच्या घरच्यांनी म्हटले की, सगळे काही या मुलीमुळेच होत आहे, हीच राहिली नाही तर सर्व प्रकरण संपेल. हे ऐकून विजय घाबरला. पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर विजयने अपर्णाच्या घरासमोर अंगावर पेट्रोल ओतून आग लावून आत्महत्या केली. अपर्णाला काही करू नका मीच मरतो, म्हणत त्याने आत्महत्या केली.
विजयच्या शरीराला आग लागल्याचे पाहून शेजाऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आग विझवली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर विजयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास कराईकुडी साउथ पोलिस करत आहेत.