कोईम्बतूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. कोरोनाच्या थैमानामुळे बेड्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. देशभरातील डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. मात्र, तामिळनाडूतील कोईम्बतूर येथून अजबच प्रकार समोर आला आहे. कोरोना संकटापासून बचावासाठी येथे चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. अनेक राज्यांमध्ये अंशतः तर काही राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी नियमांचे पालन आणि लसीकरण हे दोन महत्त्वाचे पर्याय मानले जात आहेत. एकीकडे शास्त्रज्ज्ञ विज्ञानाच्या मदतीने कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे काही ठिकाणी श्रद्धेचा मार्गाने कोरोनाला पळवून लावण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे.
थेट कोरोना देवीची स्थापना देशाच्या काही भागांमधून कोरोना देवीच्या पूजेबाबतच्या बातम्या समोर येत आहेत. आता तमिळनाडूच्या कोईम्बतूरमधूनही असाच प्रकार उघडकीस आला आहे. कोईम्बतूर भागातील इरुगुरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिराने थेट कोरोना देवीची मूर्ती तयार करून तिची स्थापना केली आहे. तसेच या कोरोना देवीची पूजा करण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती मिळाली असून, यामुळे कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकेल, असा दावा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
यापूर्वीही आजारांच्या बचावासाठी देवीची स्थापना यापूर्वीही कॉलरा आणि प्लेग यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी देवीची स्थापना करून पूजा करण्यात आली होती. लोकांना आजारांपासून वाचवण्याची ही परंपरा आहे. यापूर्वी प्लेगसह इतर काही इतर देवी-देवतांची मूर्ती तयार करण्यात आली होती, अशी माहिती आदिनाम मंदिरातील व्यवस्थापक सिवालिनेजेश्वर यांनी सांगितले.
कोरोनासाठी विशेष पूजा आणि प्रार्थना मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक ग्रोनाइटपासून दीड फूट उंचीची कोरोना देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. इतकेच नाही तर, इथे कोरोनासाठी विशेष पूजा आणि प्रार्थनाही केली जाणार असून, ४८ दिवसांच्या महायज्ञ करण्यात येणार आहे. मात्र, सामान्य नागरिकांना यात सहभागी होता येणार नाही. महायज्ञ पूर्ण झाल्यानंतरच सामान्य नागरिक कोरोना देवीचे दर्शन घेऊ शकतील, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.