पती-पत्नीमध्ये भांडणं होतच असतात. भांडणातूनच प्रेम वाढतं असंही म्हणतात. पण भांडणं टोकाला गेली तर पुढे काहीही होऊ शकतं. संसार मोडू शकतो. त्यामुळे भांडण झाल्यावर जास्त ताणू नये. एकानं माघार घ्यावी आणि भांडण मिटवावं, असा सल्ला ज्येष्ठ मंडळी देतात. मात्र रशियाच्या सायबेरियामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. नोवोकुझनेत्स्क शहरात वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्याचं कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण पत्नीला चांगलंच महागात पडलं.
नोवोकुझनेत्स्कमध्ये राहणाऱ्या तात्यानाचं तिचा पती एदरसोबत जोरदार भांडण झालं. तात्यानानं पती एदारला माफी मागायला सांगितली. मात्र त्यानं माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेली तात्यानाचं एदारला जमिनीवर पाडून त्याच्या तोंडावर बसली. तात्यानाचं वजन १०१ किलो असल्यानं एदारचा श्वास कोंडला गेला. श्वासोच्छवास बंद झाल्यानं तो गुदमरला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
पतीची हालचाल थांबल्याचं लक्षात येताच तात्याना त्याच्या तोंडावरून उठली. पतीचा मृत्यू झाल्याचं तिच्या लक्षात आलं. श्वास कोंडला जात असताना एदार तात्यानाकडे गयावया करत होता. तिला उठण्याची विनंती करत होता. मात्र तात्याना अतिशय रागात होती. तिनं तोंडावरून उठण्यास नकार दिला. त्यामुळे एदारचा श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या आणि त्याचा मृत्यू झाला.
तात्यानाच्या मुलीनं सर्वप्रथम तिच्या वडिलांचा मृतदेह पाहिला. मला माझ्या पतीला मारायचं नव्हतं. आमच्यात भांडण झालं आणि मी केवळ त्याला शांत करत होते. वाद सुरू झाल्यावर सतत बोलत होता. तो आरडाओरड करत होता. त्याचं तोंड बंद करण्यासाठी मी त्याच्यावर बसले. यामुळे त्याचा जीव जाईल याची मला जराही कल्पना नव्हती, असं तात्यानानं सांगितलं.