नागपूरः करोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट राज्यात हाहाःकार माजवत आहे. प्रादुर्भावाच्या तांडवाने सर्वच जिल्हा होरपळून निघत असताना नागपूर विभागातील भंडारा जिल्हा मात्र करोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील ९० गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या ९० गावांमधील लोकांनी नियम आणि शिस्तीचे पालन करून दैनंदिन व्यवहार सुरू ठेवल्याने करोनातून मुक्ती मिळविली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका विदर्भाला बसला होता. नागपुर तर करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, आता तिथंही रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. सोमवारी भंडारा जिल्ह्यात २३९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १०१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील या ९० गावांनी जिद्दीच्या जोरावर करोनावर मात केली आहे.
असं रोखलं करोनाला करोना विषाणू प्रादुर्भावाची साखळी मोडून काढण्यासाठी या गावांनी काही नियम घालून दिले. सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच मास्क वापरणे सक्तीचे केले. सोबतच गावात वेळोवेळी सॅनिटायझ करण्यात आले आहे. जे लोक कामानिमित्त घराबाहेर पडत होते त्यांचा वेळोवेळी फॉलोअप घेऊन त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवलं गेलं.
लसीकरणावर भर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकाऱ्याने गावात लसीकरणावरही भर दिला गेला. त्यामुळे करोना विषाणूला गावांच्या वेशीबाहेरच रोखून धरण्यात यश आलंय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी १८ हजारांहून अधिकच्या रुग्णसंख्येची नोंद होणाऱ्या विदर्भाला सोमवारी मोठा दिलासा मिळाला. दिवसभरात तपासण्यात आलेल्या अहवालात ७ हजार ५२० पॉझिटिव्ह आढळले. तर १४ हजार ८१४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आजवर ९ लाख ७६ हजार २७९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील ८ लाख ४३ हजार ९९ बरे तर १६ हजार ७८२ उपचारादरम्यान दगावले आहेत.