छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबीता ही कायमच चर्चेत असते. बबीताची भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता साकारताना दिसत आहे. मुनमुन ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच मुनमुनने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियाद्वारे तिला अटक करण्याची देखील मागणी केली आहे.
मुनमुन दत्ता लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी तिने रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचे आहे. मला भंगी सारखे दिसायचे नाही’ असे मुनमुन व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
भंगी हा शब्द वापरल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर ट्विटरवर मुनमुनला अटक करावी अशी मागणी केली जात असून #ArrestMunmunDutta टॉप ट्रेंड होताना दिसत आहे.
— Munmun Dutta (@moonstar4u) May 10, 2021
यासंदर्भात मुनमुनने ट्विटरद्वारे माफी मागितली आहे. ‘हे मी काल पोस्ट केलेल्या एका व्हिडीओ संदर्भात आहे. या व्हिडीओमध्ये मी वापरलेल्या शब्दाचा वेगळा अर्थ काढला जात आहे. कोणाच्या भावना दुखावण्यासाठी किंवा धमकी देण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या भाषेच्या अडथळ्यामुळे मला या शब्दाबद्दलचे चुकीचे ज्ञान होते. मला या शब्दाचा अर्थ कळताच मी व्हिडीओमधून तो भाग काढून टाकला. मी प्रत्येक जात, पंथ आणि लिंगाच्या व्यक्तींचा आदर करते. समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांचे अपार योगदान आहे याची मी कबुली देते. मी नकळतपणे वापरलेल्या शब्दासाठी मनापासून माफी मागते’ या आशयाची पोस्ट तिने केली आहे.