देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये गती आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशात 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या तिसऱ्या टप्प्यात 18 ते 45 वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने MyGov Corona Helpdesk ची सुरुवात करण्यात आली असून या चॅटबॉटमध्ये काही सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा वापर करुन WhatsApp च्या माध्यमातून आता लोकांना आपल्या घराजवळ असलेल्या लसीकरण केंद्राची माहिती मिळणार आहे.
MyGov Corona Helpdesk चा वापर करुन आपण WhatsApp च्या माध्यमातून आपल्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळवू शकतो.
या चॅटबॉटचा वापर कसा करायचा?
- सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवर MyGov Corona Helpdesk Chatbot साठी आवश्यक असलेला 9013151515 हा नंबर सेव्ह करा.
- WhatsApp वरुन या नंबरला नमस्ते किंवा हाय असं टाईप करा.
- मेसेज टाईप करताच आपल्याला ऑटो रिस्पॉन्स मिळेल. त्यामध्ये एक प्रश्नावली असेल.
- या प्रश्नावलीमध्ये आपण आपल्या पीन कोडची नोंद करा.
- पीन कोड नोंद केल्यानंतर आपल्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती आणि लोकेशन आपल्याला मिळेल.
या पद्धतीने आपण आपल्या जवळच्या कोरोना लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp माध्यमातून मिळवू शकता. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी अधिकृत वेबसाइट COWIN.GOV.IN वर करता येईल.
लसीकरणासाठी आपण ठिकाण निवडू शकतो का?
होय, लसीकरणासाठी कोणत्याही राज्यात आपण नांव नोंद करु शकतो. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे.