देशभरात लॉकडाउनचे नियम कठोर करूनही कोरोना मात्र काही संपण्याचं चित्र दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट तर दिसून येत आहे, मात्र ही संख्या करोना चाचण्यांचं प्रमाण कमी झालं असल्यानं कमी दिसून येतेय असं जाणकारांचं मत आहे. त्यात करोनाने बॉलिवूडकरांनाही सूट दिलेली नाही. बॉलिवूडची ‘मस्तानी गर्ल’ दीपिका पदूकोणचं संपूर्ण कुटूंबच करोनाच्या जाळ्यात सापडलंय. दीपिकाच्या वडिलांना बंगलोर इथल्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
१० दिवसांपूर्वीच दीपिकाच्या आई, बहिण आणि वडिलांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या सर्वांवर बंगलोर इथल्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर एक आठवड्यातच दीपिकाच्या आई उज्ज्वला पदूकोण आणि बहिण अनिशा पदूकोण यांची प्रकृती सुधारली आहे. परंतू दीपिकाचे वडील प्रकाश पदूकोण अजुनही कोरोनाशी सामना करत आहेत.
अभिनेत्री दीपिका पदूकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलं. “जेव्हा मी, माझं कुटूंब आणि आपण सर्वच जण ठीक होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहीजे की आपल्याला भावनात्मक रूपातूनही ठीक होणं गरजेचं असतं.” कुटूंबावर कोसळलेल्या या करोना संकटात ती त्यांच्यापासून दूर असली तरी फोनद्वारे संपर्क करून त्यांची साथ देतेय. या पोस्टमध्ये तिनं, ‘यु आर नॉट अलोन’ हा हॅशटॅग वापरला आहे.
६५ वर्षीय प्रकाश पदूकोण हे भारताचे पूर्व बॅटमिंटनपटू आहेत. एक आठवड्यापासून ते कोरोनाशी सामना करत असले तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तसंच येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज ही देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.
कोरोनामुळे बॉलिवूडमधील कलाकार अडचणीत
कोरोनामुळे बॉलिवूड क्षेत्राची अत्यंत वाईट अवस्था वाईट झाली आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक कलाकारांना कोरोना झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूर हिचे वडील रणधीर कपूरना सुद्धा करोना झाला. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय ‘पटियाला बेब्स’ फेम अनिरूद्ध दवे, ‘बिग बॉस १४’ फेम रूबिना दिलैक आणि काही दिवसांपूर्वी वडिलांना गमावलेल्या हिना खान सुद्धा कोरोनाशी झुंज देत आहे.