नागपूर: नागपूरात खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरुच आहे. सरकारचा आदेश झुगारुन बहुतांश खाजगी रुग्णालये आगाऊ पैशांची मागणी करत आहेत. नागपुरातील आयुष्यमान रुग्णालयाकडून तीन लाख ॲडव्हान्स वसूलीची पावती दाखवत माजी महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत तक्रार केलीय. त्यांनी संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केलीय.
कारवाई होऊ नये म्हणून साध्या कागदावर रुग्णालयाचा शिक्का मारुन आगाऊन पैसे घेतले जात आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाने लेखापरीक्षक नेमले होते. पण मनपाने नेमेलेल्या लेखापरीक्षकांनीच रुग्णालयाशी हातमिळवणी केल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला.
नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा; ज्या तुकाराम मुंढेंचा भर सभागृहात अपमान केला त्यांनाच पुन्हा बोलवण्याची मागणी
कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली होती.
कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत असल्यामुळे जून महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती.
भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलत होते. जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे मुंढे यांनी ठणकावले. त्यावर भाजपचे दयाशंकर तिवारी यांनी ‘सभागृहातूनच काय नागपुरातूनही चालते व्हा’ असे उत्तर त्यांना दिले. तर काँग्रेसचे नगरसेवक हरिश ग्वालवंशी यांनी संत तुकाराम यांच्या नावाला महापालिका आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कृतीमुळे कलंक लावू नये, असे विधान केले. नगरसेवकांच्या या अरेरावीमुळे तुकाराम मुंढे प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहातून निघून गेले होते.