चंद्रपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशावेळी रुग्णालयात आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. कुठे ऑक्सिजन मिळत नाही, कुठे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. तर कुठे रुग्णालयात बेडच उपलब्ध होत नाही. चंद्रपुरातही बेड न मिळाल्याने काही काळ एका झाडाखाली आसरा घेतलेल्या कोरोना रुग्णाचा अखेर मृत्यू झाला आहे. चंद्रपुरातील मुख्य शासकीय रुग्णालय परिसरात ही दुर्दैवी घटना घडलीय.
चंद्रपूर शहरातील शासकीय कोविड रुग्णालयात वेळीच बेड न मिळाल्यामुळे एका कोरोना रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय. बेड मिळत नसल्यानं या रुग्णाला रुग्णालय परिसरातीलच एका झाडाखाली आसरा घ्यावा लागला होता. ही घटना कळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यंत्रणेला जागं केलं. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने बेड मिळवून दिला. पण उपचार सुरु करण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. वेळीच बेड उपलब्ध करु दिला असता तर रुग्णाचे प्राण वाचले असते. अशी वेळ अन्य रुग्णांवर आणू नका, अशी विनंती मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणेला केलीय.
यंत्रणेला जागं केल्यावर बेड मिळाला, पण उपयोग काय?
चंद्रपूरमध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 14 हजाराच्या घरात पोहोचली आहे. अशावेळी रुग्णालयात बेड, इंजेक्शन, व्हेंटिलेटर आणि डॉक्टरचा तुटवडा पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातील एक कोरोना रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आला होता. पण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरातीलच एका झाडाखाली आसरा शोधला. ही बाब समजल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णायल प्रशासनाला जागं केलं. रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्यात आला. पण त्यासाठी 12 तासांचा उशीर झाला होता. त्यामुळे उपचार सुरु करण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या आहेत.
कोरोना रुग्णाचे रुग्णालयातून पलायन!
नागपूरच्या मेयो रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण नव्याने भरती होत आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आणि नव्याने भरती होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त अशी परिस्थिती येथे आहे. त्यामुळे जमेल त्या पद्धतीने डॉक्टर या रुग्णांवर उपचार करत आहेत. मोठ्या मुश्किलीने रुग्णांना बेड भेटत आहेत. मात्र, ज्या रुग्णांना बेड भेटले आहेत, ते रुग्णसुद्धा निट उपचार घेत नसल्याचे दिसून येत आहे. याच मेयो रुग्णालयात उपचार सुरु असताना एक रुग्ण नाकावरचे ऑक्सिजन मास्क काढून बेपत्ता झाला आहे. सोमेश्वर नामदेवराव फुटाणे असे या रुग्णाचे नाव असून तो 53 वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण काल (21 एप्रिल) पासून बेपत्ता आहे. तो नेमका कोठे आहे, याचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये.