नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. परंतु, दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. ग्रामीण भागातून अधिकृतपणे येणारा मृत्यूचा आकडा ४० पर्यंत पोहोचला असला तरी, घरातच होणाऱ्या मृत्यूंची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर पाहिजे त्या प्रमाणात भर देण्यात आला नाही. त्याचा विपरित परिणाम आता दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागात वाढली आहे. लसीकरणाच्या सुरुवातीला दोनशे ते अडीचशे लोकांच्या रांगा लागायच्या. आता १५ ते २० लोकही लस घेण्यासाठी येत नाही.
covid19 – लस घेतल्यानंतर येतोय ताप
लस घेतल्यानंतर ताप येतो, हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पाच ते सहा दिवस लोटल्यानंतर ते कोरोना टेस्ट करतात आणि त्यात ते पॉझिटिव्ह निघतात. तोपर्यंत कोरोनाचे इन्फेक्शन वाढून जाते. पुढे उपचारात होत असलेल्या अडचणींमुळे रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे. अशा अनेक घटना दररोज ग्रामीण भागात घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
– लसीकरणानंतर मृत्यू होतो, ही भीती ग्रामीण भागात आहे. ही भीती दूर करण्याची गरज आहे. असे का होतेय, याचा शोध आरोग्य विभागाने घेतला पाहिजे. किमान लस देण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करवून घेणे गरजेचे आहे. लसीमुळे कोरोनाला अटकाव घालता येतो. त्यामुळे जास्तीतजास्त लसीकरण झालेच पाहिजे. त्यामुळे लसीकरणानंतर मृत्यू होतो, हा भ्रम काढून टाकणे गरजेचे आहे.
व्यंकट कारेमोरे, सदस्य, जि.प.
covid19 Covid19 करण्यासाठी लसीकरणानंतर मृत्यूचे भय- लसीकरणाबाबतची भीती लोकांमध्ये आहे. पण, ही भीती दूर करण्यासाठी आरोग्याच्या सुविधाही वाढविणे गरजेचे आहे. रामटेक उपजिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर धूळखात पडले आहे. त्याला ऑपरेट करणारी यंत्रणा नाही. कोरोना केअर सेंटर ग्रामीण भागात वाढविणे गरजेचे आहे. सोबतच आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळसुद्धा वाढविण्याची गरज आहे. पारशिवनी, रामटेक तालुक्यात परिस्थिती भीषण आहे.
गज्जू यादव, महासचिव, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी
– प्रशासन, पदाधिकारी मूकदर्शक
लसीकरणाच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात प्रतिसाद अत्यल्प आहे. जिल्ह्याचे प्रशासन आणि राजकीय पदाधिकारीही याबाबत मूकदर्शक आहे. मृत्यूच्या मागची कारणे काय, ते कसे सोडविता येईल, याबाबतही भाष्य करण्यास कुणी तयार नाही.