नागपूर: कोरोना झालेल्या रुग्णाला आता ‘एचआरसीटी’ ची चाचणी करणे जवळपास आवश्यक केले आहे. मेडिकलमध्ये ही चाचणी मोफत केली जात असली तरी खासगी सीटी स्कॅन केंद्रांवर यासाठी अडीच हजार रुपये आकारण्यात येत आहेत. सामान्यांना ही रक्कम परवडणारी नसल्याने कोरोना चाचणीच्या धर्तीवरच ‘एचआरसीटी’ चाचणीचे दर निश्चित करण्यात यावेत,अशी मागणी आता जोर धर लागली आहे.
खासगी प्रयोगशाळेत ‘आरटीपीसीआर’साठी अवघे ५०० ते ८०० तर रॅपीड अँटीजेन चाचणी अवघ्या १५० रुपयात केली जाते. मात्र सीटी स्कॅन केंद्रावर एचआरसीटीच्या निदानासाठी अडीच हजार रुपये मोजावे लागतात. विशेष असे की, शहरात सीटी स्कॅन केंद्रावर प्रचंड गर्दी असते. रात्री उशिरापर्यंत वेटिंगवर रुग्ण असतात.
गरीब रुग्णांसाठी मेडिकल, मेयोसह सर्व शासकीय रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक असो की, बीपीएल तसेच कोरोनाच्या प्रत्येकाची सीटी स्कॅनवरील एचआरसीटी निदान मोफत केले जाते. मात्र, गरिबांना खासगीत एका एचआरसीटीसाठी अडीच हजार मोजावे लागतात. चाचणी केल्यानंतर एचआरसीटी करणे जरुरीचे आहे, असे सांगण्यात येत असल्याने सीटी स्कॅन केंद्रावर रुग्णांची मोठी गर्दी बघायला मिळते. पहिल्या लाटेत ही सीटी स्कॅन केंद्रावर अशी गर्दी दिसत नव्हती, हे विशेष.