मुंबईसह राज्यात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असताना रक्तदानाचा वेग कमालीचा घसरल्यामुळे राज्यात आजघडीला केवळ आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये मिळून केवळ २५,६०९ रक्ताच्या पिशव्यांचा साठा शिल्लक आहे तर मुंबईत केवळ ३१७८ रक्ताच्या पिशव्या रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध आहेत.
करोना रुग्णांना एकीकडे प्लाझ्मा मिळत नाही तर दुसरीकडे गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी (सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी) तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी रक्त मिळणे कठीण होऊन बसले आहे. पहिल्या टप्प्यातील करोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले होते. राज्यभरात शिवसेनेच्या शाखा शाखांमधून रक्तदान करण्यात आले होते. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी जागोजागी रक्तदान शिबीरांचे करोना काळात आयोजन केले होते. मात्र हीच परिस्थिती आगामी काळातही येणार हे ओळखून ‘राज्य रक्तसंक्रमण परिषदे’ला विशेष आर्थिक मदत व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज होती. मात्र अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या तोंडाला पाने पुसण्यात आली तसेच रक्तदान कार्यक्रमासाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रामुख्याने दरवर्षी एप्रिल, मे व जून महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. यामागे शाळा कॉलेजना असलेल्या सुट्टी, समाजसेवक तसेच रक्तदान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे कार्यकर्ते सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणे आदी अनेक कारणे असतात. गेले वर्षभर बहुतेक खासगी कंपन्यांनीही वर्क फ्रॉम होम सुरु केल्याचाही मोठा फटका आम्हाला बसल्याचे ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ प्रमुख सहाय्यक संचालक डॉ थोरात यांनी सांगितले. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये आजघडीला आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा असला तरी आम्ही सिद्धिविनायक, लालबागचा राजासह राज्यातील शेकडो स्वयंसेवी संस्थांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व रक्तपेढी प्रमुखांनाही रक्तदान शिबिरे घेण्यास सांगितले आहे. आमच्यापुढे सर्वात मोठी अडचण आहे ती लसीकरणाची. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार दुसऱ्या लसीकरणानंतर किमान २८ दिवस रक्तदान करू नये असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रक्तदाते मिळण्यात अडचण वाढू शकते, यामुळे लसीकरणापूर्वी एकदा रक्तदान करा असे आवाहन आम्ही करत असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.
राज्यात आजघडीला ३४५ रक्तपेढ्या आहेत तर मुंबईत ५८ रक्तपेढ्या असून आजघडीला राज्यात केवळ २५ हजार रक्ताच्या पिशव्या शिल्लक आहेत तर मुंबईत ३१७८ रक्ताच्या पिशव्या शिल्लक असून जेमतेम आठवडाभरचा हा साठा आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात ५५ हजाराहून जास्त रक्तपिशव्यांचा साठा रक्तपेढ्यांमध्ये होता. आता केवळ २५ हजार रक्तांच्या पिशव्या शिल्लक आहेत. एकट्या मुंबईची रक्ताची वार्षिक गरज ही अडीच लाख रक्ताच्या पिशव्यांची असून महिन्याला २२ हजारापेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्यांची गरज रुग्णांसाठी असते. आज केईएम, शीव, नायरसह मुंबईतील बहुतेक रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये ५५ ते १०० एवढ्याच रक्ताच्या पिशव्याचा साठा शिल्लक आहे.
यंदा उन्हाळ्याबरोबर करोनामुळे रक्तदान शिबिरे घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागेत आहे. ते कमी ठरावे म्हणून लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करू नये अशी मार्गदर्शन तत्वे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्यामुळे रक्तसंकलन करणे हे रक्तपेढ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. त्यातच सरकारकडून आरोग्य खाते व रक्तदानासाठी मोठी आर्थिक उपेक्षा केली जात असल्यामुळे ऐच्छिक रक्तदान आगामी काळात मोठ्या प्रमाणात घटेल असे रक्तदान क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात राज्य रक्त संक्रमण परिषदेसाठी ४४ कोटी रुपयांची तरतूद केली होती मात्र प्रत्यक्षात ५.६१ कोटी रुपयेच देण्यात आले. २०१८-१९ मध्ये २५ कोटी तरतूद केली तर प्रत्यक्षात १७.५० कोटी रुपये दिले. २०१९-२० मध्ये २५ कोटींची तरतूद मात्र प्रत्यक्षात ८ कोटी दिले तर २०२०-२१ मध्ये २० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात दाखवली असून प्रत्यक्षात फारच थोडी रक्कम वितरित केली आहे. आरोग्य विभागाला तसेच रक्त संक्रमण परिषदेला मुळातच कमी निधीची तरतूद करायची आणि प्रत्यक्षात तेही पैसे द्यायचे नाहीत असे वर्षानुवर्षे सुरु असून करोना काळातील आरोग्य विभागाची जीवतोड मेहनत लक्षात घेऊनही यात काहीही बदल झाला नसल्याची खंत आरोग्य विभागातील अनेक डॉक्टरांनी व्यक्त केली. रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली की मग मात्र आरोग्य विभागाच्या नावाने आगपाखड करायची हेच केवळ सुरु आहे, असेही आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.