लोक ऐकत नाहीत मुंबईत पूर्णपणे लॉकडाउन करायला राजकीय पक्षांकडून विरोध होतोय. लॉकडाउनच्या विरोधात भूमिका घेणार असा स्पष्ट इशाराच काही राजकीय पक्षांनी दिलाय. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउनच्याच दिशेने तयारी करत आहे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले.
“मुंबईत ३१ मार्चपर्यंत १६,५६१ बेड उपलब्ध होते. त्यात १२,६२८ बेड भरले आहेत. आता ३,९३३ बेड उपलब्ध आहेत. आयसीयू बेडची संख्या १,६२७ होती. त्यातले १,३०३ बेड वापरात आहेत. फक्त ३२४ आयसीयू बेड रिकामे आहेत. मुत्यूची संख्या कमी असली, तरी धोका वाढतोय” असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. “आयसीयूमध्ये असलेले, ऑक्सिजनवर अससलेले पेशंट आजही डेंजर झोनमध्ये आहेत. आधी झोपडपट्टीतून कोरोना रुग्ण वाढत होते. आता टॉवरमधुन रुग्ण संख्या वाढतेय” असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
“कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आपण २५ हजार बेड क्षमतेची तयारी ठेवलीय” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. पालिकेची तयारी फुकट गेली तरी चालेल, पण एकही रुग्ण बाधित होऊ नये असे त्या म्हणाल्या.
निर्बंध लागण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. हॉटेल्सना एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने परवानगी दिली जाईल, असे त्या म्हणाल्या. “लोक ऐकत नाहीत, त्यामुळे धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद होतील, सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासही बंद होऊ शकतो. मागच्यावर्षी लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली होती, तसाच निर्णय आताही होऊ शकतो.” मॉल, थिएटरही बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यात रात्रीची संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे रात्री आठ नंतर सर्व काही बंद होते. लॉकडाउन करु नका, अशी समाजातील सर्व थरातून मागणी होत आहे. कारण लॉकडाउनमुळे लोक आधीच बरोजगार झाले आहेत. त्यात नवीन लॉकडाउन राज्याला परवडणारा नाही.