नागपूर : महापालिकेच्या लक्ष्मीनगर, हनुमाननगर व मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या भागातील हॉटस्पॉटची माहिती लपविली जात आहे. या परिसरातील नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे बाधितांची संख्या वाढण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मनपाने हॉटस्पॉट परिसराची माहिती दररोज जाहीर केल्यास त्या त्या परिसरातील नागरिकांना सतर्कता बाळगता येईल. काही प्रमाणात संक्रमण टाळता येईल. परंतु अशा प्रयत्नावर पाणी फेरण्याचा प्रकार सुरू आहे.
कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडून नियोजनपूर्वक कामे होत नसल्याचे चित्र आहे. मनपा मुख्यालयात दररोज बैठका होत आहेत. परंतु शहरातील हॉटस्पॉट कसे कमी करता येईल, कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, यावर चर्चा होताना दिसत नाही. ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत अशा भागात हॉटस्पॉट जाहीर करून नागरिकांना वेळीच सावध करण्याची गरज आहे.
मनुष्यबळाचा अभाव, खर्चाची बचत हॉटस्पॉट जाहीर केल्यास संबंधित क्षेत्र प्रतिबंधित जाहीर करावे लागते. त्यासाठी टिन, लाकडी साहित्य यावर खर्च करावा लागतो. तसेच पोलीस बंदोबस्त लावावा लागतो. यामुळे हॉटस्पॉट जाहीर करण्याचे टाळले जात असल्याची मनपात चर्चा आहे.
कोरोना वॉर रुम कशासाठी? कोरोनाची लक्षणे असल्यास कोणती खबरदारी घ्यावी, बाधितांना भरती व्हायचे असल्यास कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहे, याची माहिती मनपाच्या कोरोना वॉर रुममधून मिळणे अपेक्षित आहे. परंतु खाली बेडची माहिती मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.