पुणे : भावनेच्या भरात चूक झाली, तुझा आयुष्यभर पत्नी म्हणून सांभाळ करतो, माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नकोस. जर गुन्हा दाखल केलास तर तुझ्या कुटुंबाच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी देणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तिविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात एका 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. रामदास दत्तोबा थोरात (रा.आयुधिक कार्यशाळा शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून थोरात याने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर भावनेच्या भरात माझी चूक झाली. या चुकीबददल तुला घर किंवा जागा घेऊन देतो. तसेच दर महिन्याला 10 हजार रूपये आणि निवृत्त झाल्यावर 5 हजार रूपये व निवृत्तीच्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम देतो. नोटरी करून देऊन पत्नी म्हणून सांभाळ करतो. पण माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नकोस असे थोरात याने महिलेला सांगितले. मात्र जर गुन्हा दाखल केलास तर तुझ्या कुटुंबाच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने महिलेला दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोलीस करीत आहेत.