औरंगाबाद : पूर्व वैमनस्यातून एका तरुणाने चौघांवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. या हल्ल्यामध्ये 22 वर्षीय पत्रकार पुत्राचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंगुरी बाग परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद दानिशोद्दीन सय्यद शाफिओद्दीन वय-22 (रा.अंगुरीबाग) असं मृत तरुणाचे नाव आहे. तर शेख सलीम, शेख बाबा, शेख जब्बार अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर नितीन उर्फ गब्या भास्करराव खंडागळे वय-27 (रा.अंगुरीबाग) सह त्याची आई, बहीण व भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, जखमी शेख जब्बार उर्फ शम्मू सोबत आरोपी गब्याचा दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. तेव्हापासून गब्याच्या मनात खुमखुमी होती. मंगळवारी रात्री अंगुरीबाग भागात बाबा, जब्बार आणि सलीम असे तिघे तिथे बोलताना उभे होते व दानिश बाजूला असलेल्या एका घराच्या ओट्यावर बसलेला होता.
त्याच दरम्यान तेथे आरोपी गब्या आला व त्याने धारदार चाकू काढत जब्बारवर हल्ला चढवला. सलीम आणि बाबा यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता गब्याने त्यांच्यावर देखील वार केले. हे पाहून बाजूला मोबाईल बघत बसलेला दानिश तेथे आला व भांडण सोडवीत असताना गब्याने धारदार चाकू दानिशच्या छातीत भोसकला. रक्तबंबाळ अवस्थेत तो जमिनीवर कोसळला आरडाओरड झाल्याने गब्याने तेथून पळ काढला.
परिसरातील नागरिकांनी चौघा जखमींना रुग्णालयात हलविले मात्र चौघा जखमीमधील दानिशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत आरोपी गब्या त्याची आई, बहीण आणि भावाला अटक केली. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणपत दराडे करीत आहेत.