नागपूर : हिंगणा मार्गावरील निलडोह येथील रामसन्स कॉस्टिंग प्रा. लि. कंपनीतील दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कंपनीमालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राजेश सारडा यांच्या मालकीची ही कंपनी आहे.
कंपनीत कामगार पुरविण्याचे कंत्राट प्रेमसिंग नेमसिंग राठोड यास देण्यात आले आहे. प्रेमसिंगने देवनाला (ता. पांढुर्णा) येथील सुभाष किसनलाल ताडाम (32) आणि इतर कामगारांना कामाला लावले होते. 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9 च्या सुमारास मृतक सुभाष ताडाम, हरेंद्रसिंग बिरसासिंग (52) राजीवनगर, अजय वर्मा आणि दिनेश कुंभरे हे कंपनीतील एक क्रमांकाच्या भट्टीत काम करीत होते. चारही कामगार क्रेनला लोहचुंबक बांधून त्यास जुना लोहा चिपकवून तो लोहा वितळविण्यासाठी लोखंडाच्या भट्टीत टाकत होते. अचानक लोहाचुंबकला चिकटलेले लोखंड लोखंडी भट्टीतील गरम द्रावणात पडून त्या द्रावणाचे पाणी चारही कामगारांच्या अंगावर उडून ते गंभीररित्या भाजल्या गेले.
हरेंद्रसिंगचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता तर सुभाष, अजय आणि दिनेश हे गंभीर जखमी झाले होते. तिघांनाही सीताबर्डी येथील म्यूर मेमोरियल हॉस्पिटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान सुभाषचा देखील मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. तपासात कंपनीमालक राजेश सारडा, व्यवस्थापक एस. माणिक नंदन सौंदर्य राजन आणि ठेकेदार प्रेमसिंग राठोड यांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना न केल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला असे निष्पन्न झाले. त्यावरून कंपनीमालकासह तिघांवर 304(अ), 337, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.