नागपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. ९ नवीन हॉट स्पॉट निर्माण झाल्याने मनपा प्रशासनाची झोप उडाली आहे. कोविड नियंत्रणासाठी बाधितांचा सर्वे करण्यासोबतच स्क्रिनिंग व बाधितांना उपचारासाठी पाठविले जात आहे. अशा परिस्थितीत मंगल कार्यालय , लॉन, सभागृहात विना अनुमती समारंभ आयोजित केल्यास व नियमाचे उल्लघन केल्यास सील करण्याचा इशारा मनपा आयुक्त राधाकृसन बी. यांनी दिला होता. असे असतानाही विना अनुमती विवाह समारंभ आयोजनाला परवानगी दिल्या प्रकरणी सोमवारी नरेंद्र नगर येथील तुकाराम सभागृहाचे संचालक व विवाह समारंभ आयोजक यांना मनपाच्या उपद्रव शोध पथकाने प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारला.
लग्न समारंभाला १०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असताना तुकाराम सभागृहात आयोजित लग्न समारंभाला २५० हून अधिक लोक उपस्थित होते. निर्धारित संख्येपेक्षा जास्त लोक असल्याने आयोजकांना पाच हजार तर सभागृहावर ५ हजारांचा दंड आकारण्यात आला. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी विवाह समारंभाला अनुमतीपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती असल्याची माहिती धंतोली झोनचे प्रमुख नरहरी बिरकड व अरविंद लाडेकर यांना दिली. तसेच धंतोली झोनचे सहायक आयुक्तांना याची सूचना दिली. त्यानंतर नियमानुसार संबंधित सभागृहावर १० हजार दंड आकारला होता. मात्र नियमानुसार पहिल्या वेळी ५ हजार दंड आकारता येतो. त्यामुळे सभागृह व आयोजक यांच्यावर प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती तांबे यांनी दिली.