नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. साहित्याबद्दल नामदेव कांबळे यांना, कला क्षेत्रातील कार्याबद्दल परशूराम गंगावणे यांना, समाजसेवेबद्दल सिंधूताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांना, जसवंतीबाई पोपट यांना व्यापार, उद्योगासाठी (सर्व : महाराष्ट्र) पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला आहे. तर उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल रजनीकांत श्रॉफ (महाराष्ट्र) यांना पद्मभुषण जाहीर झाला आहे.
कर्नाटकातील डॉ. बेल्ले मोनप्पा हेगडे यांना वैद्यकीय, अमेरिकेतील नरिंदर सिंह कपानी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी, दिल्लीतील मौलाना वहीदुद्दीन खान यांना आध्यात्मासाठी, दिल्लीतील बी. बी. लाल यांना पुरातत्व क्षेत्रासाठी, ओडिशातील वालुकाशिल्पी सुदर्शन साहू यांना कलेसाठी पद्मविभुषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला आहे. सात मान्यवरांना पद्मविभूषण, 10 पद्मभुषण तसेच 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
पद्मभूषणचे उर्वरित मानकरी असे : कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा (कला, केरळ), तरुण गोगोई (मरणोत्तर, सार्वजनिक जीवन, आसाम), चंद्रशेखर कांब्रा (साहित्य आणि शिक्षण, कर्नाटक), नृपेंद्र मिश्रा (सिव्हिल सर्व्हिस, उत्तर प्रदेश), केशुभाई पटेल (मरणोत्तर, सार्वजनिक क्षेत्र, गुजरात), कालबे सादिक (मरणोत्तर, आध्यात्म, उत्तर प्रदेश), तारलोचन सिंग, (सार्वजनिक क्षेत्र, हरियाणा).