अखेर WhatsApp ची माघार; तीव्र विरोधानंतर नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्थगित

Date:

नवी दिल्ली :सोशल मीडियावरील संवादाचे सर्वाधिक लोकप्रिय माध्यम असलेल्या WhatsApp ने अखेर माघार घेतली आहे. WhatsApp ने नवीन प्रायव्हसी पॉलिसी पुढील तीन महिन्यांसाठी लांबवणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हॉट्सअॅप युझर्सना दिलासा मिळाला आहे. आता, ८ फेब्रुवारीला कोणत्याही युझरचे अकाऊंट बंद होणार नाही.

नवीन वर्षात व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी जाहीर करत जगभरातील कोट्यवधी युझर्सना धक्का दिला होता. यानुसार, नवीन पॉलिसी मान्य न केल्यास ८ फेब्रुवारी २०२१ पासून व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, यानंतर जगभरातील युझर्सनी या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला जोरदार विरोध करण्यात आला. तसेच व्हॉट्सअॅपवर नाराजीही व्यक्त करण्यात आली. मात्र, चौफेर होणारी टीका आणि विरोधानंतर व्हॉट्सअॅपने आता एक पाऊल मागे घेत नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, नवीन प्रायव्हसी पॉलिसी मान्य करण्यासाठी दिलेली मुदत मागे घेण्यात येत आहे. ८ फेब्रुवारी २०२१ रोजी कोणत्याही युझरचे अकाऊंट बंद किंवा डिलीट करण्यात येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप गोपनियता आणि सुरक्षेवर कशापद्धतीने काम करते, याविषयी स्पष्टता आणणार आहोत. चुकीची माहिती आणि पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. १५ मे २०२१ रोजी व्यावसायिक पर्याय उपलब्ध करण्यापूर्वी नवीन प्राइव्हसी पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी हळूहळू युझर्सपर्यंत पोहोचणार आहोत, असे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरील डेटा पूर्वीपासूनच फेसबुकसोबत शेअर केला जात होता. परंतु, व्हॉट्सअॅपवरील जवळपास सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाण्याच्या संभ्रमामुळे युझर्समध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या स्पर्धकांकडे अनेक युझर्स वळले. याचा मोठा फटका व्हॉट्सअॅपला बसला. या पार्श्वभूमीवर अखेरीस व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपकडून विस्तृत स्पष्टीकरण देण्यात आले होते. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मित्रांसह कुटुंबाशी होत असलेले चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या गोपनीयतेला कोणताही धोका नाही. नवीन प्रायव्हसी पॉलिसी ही बिझनेस अकाऊंट समोर ठेवून तयार करण्यात आली आहे. WhatsApp कोणत्याही युझर्सचे मेसेजेस पाहू शकत नाही किंवा केलेल्या कॉल्समधील संभाषण ऐकू शकत नाही. एवढेच नाही, तर शेअर केलेले लोकेशनही पाहू शकत नाही. फेसबुकही नाही, असेही व्हॉट्सअॅपने यापूर्वी स्पष्ट केले होते.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related