मुंबई : राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला असून,कार्यालयात गडद रंगाचे,चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे,जीन्स टी-शर्टचा वापर न करण्याबरोबरच कार्यालयात स्लीपरचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.कर्मचारी,अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावे असे सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमुद केले आहे.
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकामुळे आता सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार होणार आहे. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे याचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.ज्यामध्ये ड्रेस कसा असावा,कुणी कुठले कपडे घालावे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार कार्यालयात कर्तव्यावर असताना गडद रंगाचे,नक्षीकाम असलेले कपडे परिधान करु नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयात करु नये अशाही सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.या सूचना देतानाच कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.महिलांनी साडी, सलवार, कुर्ता, शर्ट आणि ट्राऊझर्स वापरावे असेही या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे.महिला कर्मचाऱ्यांनी चप्पल, सँडल, शूज वापरावे पुरुष कर्मचाऱ्यांनी शक्यतो शूज किंवा सँडल वापरावी असे स्पष्ट आदेश देतानाच कार्यालयात स्लीपरचा वापर करु नये अशा सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.