करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा थरार !!!!

Date:

करमाळा : नरभक्षक बिबट्याचा थरार करमाळा तालुक्यातील बिटरगाव भागात पाहायला मिळाला. येथील एका शेतात मका टोचायचे काम सुरू असताना एक महिलेला दबा धरून बसलेला हा बिबट्या दिसला लगेच तिने जोरात ओरडत त्याच्या दिशेला दगड भिरकावत असताना त्याने अंगावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सोबतचे लोकांनीही गोंधळ घालत दगडांचा भडीमार सुरू केल्यावर बिबट्याने माघार घेतली. वन विभागही तातडीने तयारीसह येथे आला व ट्रॅप लावत बिबट्या नजरेस पडताच तीन फायर केले. मात्र यावेळीही दुर्दैवाने बिबट्या निसटला. मग बिबट्या लपलेल्या केळीच्या शेताला चारही बाजूने घेरण्यात आले.

दरम्यान बिबट्याच्या शोधासाठी वैदू जातीच्या लोकांनी एक गाडीतून त्यांची कुत्रीही आणली. शेजारी असलेल्या उसातून पळून जाऊ नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने ऊस पडला. अंधार पडू लागल्याने भोवती ट्रॅक्टर आणून दिवे लावण्यात आले. परिसरातील शेकडो ग्रामस्थ हातात काठ्या कुऱ्हाडी व मशाली घेऊन सज्ज होते. मात्र तीन तासाच्या प्रयत्नानंतरही बिबट्या निसटल्याने दहशत अजून वाढली आहे. ढोकरी – बीटरगाव येथील ट्रॅप मधून बिबट्याने पळ काढल्याने आता जवळपासच्या सर्व वस्तीवरील आणि ढोकरी, बिटरगाव, भिवरवाडी, वांगी 1 , वांगी 4 परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

एक डिसेंबरपासून हा बिबट्या करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी, अंजनडोह आणि शेटफळ चिखलठाण परिसरात आपली दहशत ठेऊन आहे. आजपर्यंत करमाळा परिसरात  तीन जणांचा बळी ह्या बिबट्याने घेतला आहे. शार्प शूटर डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्यासह पाच गनमॅन ट्रॅप लावून बिबट्याच्या मागावर आहेत.  साडे चार वर्षे त्याचे वय असावे असा अंदाज डॉ. मंडलिक यांनी व्यक्त केलं आहे. परिसरातील लोकांनी सायंकाळी पाच ते सात आणि सकाळी दहा ते बारापर्यंत काळजी घ्यावी, कारण हा त्याचा हल्ला करण्याची वेळ आहे. हा बिबट्या जनावरांवर हल्ला करत नाही. तो फक्त माणसांवर हल्ला करतो. कदाचित माणसामुळे तो डिस्टर्ब झाला असावा, असा अंदाज मंडलिक यांनी व्यक्त केला. पण आज रात्री पेट्रोलिंग करून बिबट्याला मारू असा विश्वास त्यांना आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related