नागपूर: एकतर्फी प्रेमसंबंधात अडचण निर्माण करीत असल्याने प्रेयसीच्या आजीचा व नातवाचा खून करणाऱ्या अल्पवयीन तरुणाने गुरुवारी रात्री रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
अशी आहे मुख्य घटना
हजारी पहाड येथे राहणाऱ्या लक्ष्मी मारुती धुर्वे (६०) आणि यश मोहन धुर्वे (१०) यांची चाकूने हल्ला चढवून हत्या करण्यात आली होती.पेंटिंगचे काम करणारा मोहन धुर्वे कृष्णानगरजवळ असलेल्या हजारी पहाड येथे राहतो. मोहनच्या कुटुंबात आई लक्ष्मी, पत्नी सोनाली, मुलगी आणि मुलगा यश आहे. सोनाली मोलकरणीचे काम करते. यश पाचव्या वर्गात तर मुलगी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकते.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी विद्यार्थिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन आरोपीच्या संपर्कात आली. तो तिला नियमित फोन करीत होता. मुलीच्या घरच्यांना अल्पवयीन मुलगा हा आपल्या मुलीच्या कॉलेजमध्ये शिकत असेल असे वाटले. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले. तीन महिन्यापूर्वी त्यांना तो मुलगा आपल्या मुलीवर प्रेमसंबंधासाठी दबाव टाकत असल्याचे समजले. कुटुंबीयांनी मुलीला समजावून त्याच्याशी दूर राहण्यास सांगितले. मुलीने घरच्यांचे म्हणणे ऐकले. यामुळे अल्पवयीन मुलगा संतापला. दोन महिन्यापूर्वीच त्याने मुलीच्या आईला पाहून घेण्याची धमकी दिली. याची माहिती होताच लोकांनी त्यांना पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. अल्पवयीन मुलगा अनेकदा चाकू घेऊन विद्यार्थिनीच्या घरीही आला होता. त्यामुळे कुटुंबीय त्याच्या दहशतीत होते. बदनामीची चिंता आणि आपल्या मुलीचे काही बरे-वाईट होईल या भीतीमुळे कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली नाही. त्यांनी त्या मुलाला आपल्या मुलीला त्रास न देण्याबाबत अनेकदा विनंती केली. परंतु तो ऐकायला तयार नव्हता. त्याच्या भीतीमुळे कुटुंबीयांनी मुलीला व तिच्या भावाला मामाकडे राजनगर येथे पाठविले. दोन दिवसापूर्वीच मुलीचा भाऊ यश आपल्या घरी आला होता. नेहमीप्रमाणे आई-वडील सकाळी कामावर निघून गेले. घरी यश आणि त्याची आजी हेच होते. अशी शंका आहे की, दुपारच्या वेळी तो अल्पवयीन घरी आला. त्याने खुर्चीवर बसलेल्या लक्ष्मीची धारदार शस्त्राने हत्या केली. यानंतर चिमुकल्या यशचा केबलने गळा घोटला, नंतर त्यालाही चाकूने वार करून संपविले. वस्तीतील सर्व घरे एकमेकांना लागून आहेत. परंतु दुपारची वेळ असल्याने बहुतांश लोक कामावर गेले होते. त्यामुळे कुणालाही घटनेची माहिती होऊ शकली नाही. दुपारी २ वाजता सोनाली कामावरून घरी परतली. तिला सासू लक्ष्मी खुर्चीवर पडून दिसली. जवळ गेल्यावर तिचा खून झाल्याचे समजले. सोनालीने परिसरातील नगरसेवक कमलेश चौधरी यांना घटनेची माहिती दिली. कमलेश यांनी गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत यश सापडला नव्हता. परंतु शौचालयात यशचा मृतदेह पाहून पोलिसही हादरले. सोनालीने अल्पवयीन मुलगा धमकावीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन तपासून पाहिले तेव्हा तो काही वेळापूर्वी घटनास्थळी असल्याचे दिसून आले.
कुटुंबीयांच्या विनंतीचाही परिणाम नाही
तीन महिन्यापूर्वी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला त्रास देऊ नको, असे सांगत या अल्पवयीन मुलाकडे अक्षरश: विनंती केली होती. परिस्थितीची जाणीव करून देऊन आपल्या मुलीच्या मागार्तून बाजूला होण्याची विनंती त्यांनी केली होती. मात्र त्यावर कसलाही परिणाम पडला नाही. तो काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. दोन महिन्यापूर्वी त्याने मुलीच्या आईला, ह्यआंटी, तुम्ही पहात राहा, या दोन महिन्यात मी काय करणार आहे ते ह्ण अशी गंभीर धमकीही दिली होती. आज त्यानेही धमकी खरी करून दाखविली. ज्या पद्धतीने त्याने ही घटना अमलात आणली त्यावरून तो सराईत गुन्हेगार असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्या वडिलांचे कोराडी मार्गावर फेब्रिकेशनचे दुकान आहे.
इन्स्टाग्रामवरून झाली होती ओळख
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीची ओळख आधी अरबाज नामक युवकाशी इन्स्टाग्रामवरून झाली होती. अरबाज तिच्याशी मोबाईलवरून बोलायचा. अशातच तिची मोबाईलवरूनच या अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. त्याने अरबाज हा चांगल्या वृत्ताीचा नसल्याने त्याच्याशी न बोलण्याचा सल्ला तिला दिला होता. यानंतर त्याने मुलीशी सलगी वाढविली. कुटुंबीयांनी विरोध करूनदेखिल अनेकदा तो चाकू घेऊन कुटुंबीयांना धमकावण्यासाठी तिच्या घरी यायचा.