देशातील प्रसिद्ध मसाला कंपनी महाशिया दी हट्टी (MDH) चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज पहाटे 5.38 वाजता निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. व्यापार आणि उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचा गेल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मभूषणने सन्मान केला होता.
गुलाटी यांचा जन्म 27 मार्च, 1923 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. 1947 च्या फाळणीमध्ये ते भारतात आले होते. तेव्हा त्यांच्याकडे केवळ 1500 रुपये होते. भारतात आल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी टांगा चालवायला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी पैसे जमवत दिल्लीच्या करोलबागमध्ये एक मसाल्याचे दुकान उघडले. या एका दुकानावरून त्यांनी देशाची प्रसिद्ध कंपनी उभी केली. आज त्यांच्या एमडीएच कंपनीच्या भारतातच नाही तर दुबईतदेखील फॅक्टरी आहेत. त्यांच्या एकूण १८ फॅक्टरी आहेत. याद्वारे ते जगभरात पोहोचले आहेत. एमडीएचची ६२ उत्पादने आहेत.
5 वी नापास महाशय धर्मपाल यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान
अंगात पांढरा कुर्ता, सोबतीला जॅकेट आणि डोक्यावर लाल रंगाची पगडी परिधान केलेला साधारण माणूस टीव्हीवरील जाहिरातीत झळकला. पाहता- पाहता हा माणूस सर्वांचा लाडका बनला. आपल्या कष्टाच्या जोरावर एका मसाला कंपनीला जगभरात मान्यता मिळवून देण्याचं काम या माणसानं केलंय. ‘असली मसाले सच सच, एमडीएच एमडीएच’…. अशी जिंगल बेल ऐकली तरी आपल्या डोळ्यासमोर महाशय धर्मपाल यांचा चेहरा उभारतो. एमडीएच मसाला कंपनीचे मालक गुलाटी हे 2 हजार कोटींचे मालक आहेत. केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या गुलाटी यांनी 2018 मध्ये वर्षाकाठी 25 कोटी रुपये पगार घेतला.
95 वर्षीय धर्मपाल हे जगातील सर्वात वयोवृद्ध अॅडव्हरटाईज स्टार होते. अगदी वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असतानाही ते जोशपू्र्ण आणि तंदुरुस्त होते. मी सकाळी 4 वाजता उठतो, त्यानंतर नेहरू पार्कमध्ये जाऊन 1000 पाऊले चालतो. पुन्हा घरी येऊन योगासनेही करतो. ‘अभी तो मै जवान हूँ, मी म्हातारा नाही, असे धर्मपाल म्हणतात. तर, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांची सेवा करा आणि कष्ट करत राहा, असा सल्लाही महाशय धर्मपाल यांनी तरुणाईला दिला होता.
जोपर्यंत माणूस प्रामाणिक होत नाही, जोपर्यंत माणूस कष्टाळू होत नाही. सर्वांशी गोड बोलणार नाही, तोपर्यंत त्यास देवाचा आशीर्वाद मिळणार नाही. आई-वडिलांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा यामुळेच मी यशस्वी झालो, असे पद्मभूषण पुरस्कारप्राप्त 95 वर्षीय महाशय धर्मपाल हट्टी यांनी म्हटले होते.