नागपूर : महापालिकेने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांनी शिक्षकांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. एकीकडे ऑनलाईन बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी स्वतःची काळजी घेतली, त्याच वेळी पावणेचार हजार विद्यार्थ्यांना शाळेत एकत्र बोलावले जात आहे.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नववी ते बारावीपर्यंत शाळा, कॉलेज सुरू करण्याचे आदेश जारी केले आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी महापालिकेच्या माध्यमिक शाळा, कॉलेज २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबात उपाययोजनांसाठी महापालिकेच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी गुरुवारी ऑनलाईन बैठकीतून माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व सहायक शिक्षकांना शाळा सुरू करण्यासंबंधी आवश्यक निर्देश दिले.
मनपाच्या २५ माध्यमिक शाळा व चार कनिष्ठ महाविद्यालयांतील जवळपास तीन हजार ७५४ विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान विषय शिकविले जातील. प्रत्येक शाळा चार तास सुरू राहणार आहे.
शाळा व्यवस्थापन समिती यांच्या बैठका २० नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळेमध्ये घेण्यात येत असून, पालकांचे संमतिपत्र घेण्याचे काम सुरू झाले आहे. झोन स्तरावरून सर्व २९ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सर्व शाळा निरीक्षकांना त्यांच्या झोनमधील माध्यमिक शाळांची जबाबदारी देण्यात आली आहे.
६० टक्के शिक्षकांची चाचणी पूर्ण
राज्य सरकारच्या निर्देशानुसार मनपाच्या शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची सूचना केली. आतापर्यंत ६० टक्के शिक्षकांनी चाचणी केली आहे. उर्वरित शिक्षक २० नोव्हेंबरपर्यंत चाचणी करतील. शाळांमध्ये थर्मामीटर, थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर, जंतुनाशक साबण आदी खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी घेतली जाईल काळजी
- शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रोज थर्मल स्क्रीनिंग
- शाळेच्या आवारात इतर कुणालाही प्रवेशबंदी
- शाळेत चारपेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येण्यास बंदी
- मास्क, पाण्याची बॉटल, शालेय साहित्याची अदलाबदल करता येणार नाही.
- आजारी मुलांना शाळेत बंदी
- संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेला माहिती
- वर्गखोली, स्टाफ रूममध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन
- विद्यार्थ्यांना पालक स्वतःच्या वाहनाने शाळेत सोडतील
- स्वच्छतागृहाचे दररोज निर्जंतुकीकरण, गर्दी टाळणार