नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या ५० स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. या मानवी चाचणीला आज एक आठवडा झाला. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले. स्वयंसेवकांमध्ये २० महिला व ३० पुरुषांचा सहभाग आहे.
‘भारतात पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मार्फत ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अॅस्टॅजेनका’ कंपनीकडून‘ कोविशिल्ड’ लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. गेल्या महिन्यात नागपूर मेडिकलला या चाचणीची परवानगी मिळाली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात पल्मनरी मेडिसीनचे विभाग प्रमुख, कोविड हॉस्पिटल आयसीयूचे इन्चार्ज व ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात या चाचणीला सुरुवात झाली. या चाचणीसाठी सुमारे २००वर स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. यातील १८ ते ७० वयोगटातील निरोगी स्वयंसेवकांची निवड करून त्यांची कोविड व रक्ताची तपासणीसाठी करण्यात आली. यात सामान्य अहवाल आलेल्या ५० लोकांची निवड करून पहिला डोज देण्यात आला. विशेष म्हणजे, लस घेणाऱ्यांमध्ये २० महिला, ६० वर्षांवरील पाच ज्येष्ठ नागरिक तर १८ ते ५५ वयोगटातील २५ पुरुषांचा समावेश आहे.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले, पहिला डोज दिलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुणालाच कशाचा त्रास नाही. आता दुसरा डोज २८ दिवसांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे. त्यानंतर ५६ व्या दिवशी रक्ताची तपासणी करण्यात येईल. ९०व्या दिवशी त्यांची फोनवरून प्रकृतीविषयी चौकशी केली जाईल आणि १८०व्या दिवशी त्यांची पुन्हा हॉस्पिटलमध्ये रक्ताची तपासणी केली जाईल.