नागपूर : जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता संसर्गाची तीव्रता कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ३१ जुलै रोजी २५८ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज तब्बल ८८ दिवसानंतर २५७ रुग्णांचे निदान झाले. रुग्णांची एकूण संख्या ९३,९०३ झाली. १३ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३,०७७ वर गेली. आज आढळून आलेल्या बाधितांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे झाले.
नागपूर जिल्ह्यात रविवारी २२२ रुग्ण व १८ मृत्यूची नोंद झाली. दोन दिवसांत ४७९ रुग्ण व ३१ रुग्णांचे मृत्यू झाल्याचे दिसून आले. रुग्णसंख्या कमी झाली असताना मागील दोन दिवसांत चाचण्यांची संख्याही कमी झाली. रविवारी २,४४८ तर सोमवारी ४,६४२ चाचण्या झाल्या. यातही आज आरटीपीसीआर २,३०६ तर रॅपिड ॲन्टिजेनच्या २३३६ चाचण्या झाल्या. ॲन्टिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होणे आश्चर्यकारक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील २५ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण अधिक राहिले आहे. आज ५६६ रुग्ण बरे झाले.
तीन प्रयोगशाळांमध्ये शून्य पॉझिटिव्ह
माफसू, नीरी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नमुनेच पाठविण्यात आले नाहीत. यामुळे तिन्ही प्रयागशाळांमध्ये शून्य पॉझिटिव्हची नोंद झाली. मेडिकलमध्ये केवळ २२ नमुने तपासले. यात तीन रुग्ण बाधित आढळले. मेयोमध्ये सर्वाधिक जास्त, १९७ नमुने तपासले असता ३१, एम्समध्ये ९५ नमुने तपासले असता १३, खासगी लॅबमध्ये २,३३६ नमुने तपासले असता १९५ रुग्णांचे निदान झाले. २,३३६ ॲन्टिजेन चाचणीतही केवळ १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
मृत्यूदर २.८७ टक्क्यांवर स्थिर
२५ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील मृत्यूदर २.८७ टक्के होता. आजही हे प्रमाण स्थिर आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूदर आणखी कमी होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु मागील तीस दिवसांपूर्वी रिकव्हरी दर ७६.२७ टक्के होता तो आता ९१.३३ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीने वाढीचा दर ३३.६ दिवसांनी वाढून तो आता १३६.३ दिवसांवर आला आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ४,६४२
बाधित रुग्ण : ९३,९०३
बरे झालेले : ८५,७६३
उपचार घेत असलेले रुग्ण : ५,०६३
मृत्यू : ३,०७७