भिवापूर : प्रतिकूल वातावरण आणि परतीच्या पावसाचा फटका यातून पिकांना वाचविण्यासाठी विविध उपाययाेजना केल्या.परंतु, त्यात यश न आल्याने पीक हातचे गेले आणि हताश झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडबाेरी येथे गुरुवारी (दि. २२) घडली असून, शुक्रवारी (दि. २३)सकाळी उघडकीस आली.
प्रभाकर रामभाऊ माळवे (४५, रा. गाेंडबाेरी, ता. भिवापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रभाकर यांच्याकडे चार एकर शेती आहे. सततची नापिकी आणि बाजारात शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे ते वैतागले हाेते. याही परिस्थितीत पैशाची जुळवाजुळव करीत त्यांनी साडेतीन एकरात साेयाबीनची पेरणी आणि अर्धा एकरात कपाशीची लागवड केली. मात्र, सततचा व परतीचा पाऊस आणि पिकांवर झालेला किडींचा प्रदुर्भाव यातून पिकांना वाचविण्यासाठी त्यांनी धडपड केली. परंतु त्यात फारसे यश न आल्याने ते हताश झाले. त्यातच त्यांनी गुरुवारी सकाळी शेतात कीटकनाशक प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.