नागपूर : पोर्णिमा दिनानिमित्त नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या नागपूर महापालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून ऊर्जा बचत गटातील यंदाचा ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मनपाने पोर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू केलेल्या उपक्रमाची अर्थ डे नेटवर्क इंडियाने दखल घेतल्याने देशात नावलौकीक झाला आहे.
मनपा आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनतर्फे २०१४ पासून ऊर्जा बचतीच्या दृष्टीने पोर्णिमा दिवस हा विधायक उपक्रम तत्कालीन महापौर व आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोर्णिमेच्या रात्री ८ ते ९ या वेळात अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केलेजाते. यातून आतापर्यंत २ लाख ५३ हजार २०१ किलो कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणण्यात आले. एलइडी पथदिवे प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिकेने १ लाख ३९ हजार ६९५ पारंपरिक पथदिव्यांचे रुपांतर एलइडी पथदिव्यांमध्ये केले. यामुळे वषार्ला २ लाख २७ हजार यूनिट्स एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्बन फुटप्रिंट्समध्ये बचत झाली आहे.
अर्थ डे नेटवर्क इंडियाद्वारे देशातील महापालिकांसाठी १० वेगवेगळ्या श्रेणीतील स्टार म्युनिसिपल लिडरशीप पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संचालक कौस्तभ चॅटजी व सुरभी जायस्वाल यांनी ऊर्जा बचत आणि हरीत आच्छादनाचा वाढता वापर या दोन श्रेणींमध्ये नागपूर महापालिकेचा नामांकन प्रस्ताव दाखल केला होता. अर्थ डे नेटवर्क इंडियाच्या भारतीय संचालक करुणा सिंग, महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्ण बी.यांनी यांनी अभिनंदन केले आहे.
वेगवेगळ्या श्रेणींमध्ये देशातील पुरी, महाबळेश्वर, अहमदाबाद, थिरूअनंतपुरम आणि करीमनगर या महापालिकांनाही स्टार म्युनिसिपल लिडरशीप पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सर्वांची जबाबदारी वाढली : संदीप जोशी
या यशामागे नागरिकांनी दाखविलेला पुढाकार, समंजसपणा आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे करण्यात येणारी जनजागृतीची सुद्धा मोठी भूमिका आहे. या यशासह शहरातील नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. वीज बचतीसाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्र या महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.