नागपूर : कोरोनाच्या काळात आशा वर्कर आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना सर्वेक्षणाचे ३०० रुपये देऊन इतर सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने संविधान चौकात सोमवारी आंदोलन केले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना पुर्ण करण्याची जबाबदारी आशा वर्कर्सवर येऊन ठेपली आहे. आशा वर्करसोबत आरोग्य कर्मचारी, स्वयंसेविका, स्वयंसेवक ठेवण्याची जबाबदारी आहे. आशा वर्करवर संपूर्ण कामाचा भार टाकण्यात येत आहे. शहरी भागात एएनएम, सुपरवायझर, महापालिका कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना राजीनामा द्या किंवा काढून टाकण्याची अन्यथा मृत्यूनंतर ५० लाख मिळणार असल्याची भाषा वापरण्यात येत आहे. सोबतच सॅनिटायझर, मोजे, मास्क, कॅप, प्रिंटेड टी शर्ट, अॅप्रन कालावधी संपूनही उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. २२ मार्चपासून कोरोनासाठी काम करणाऱ्या आशा वर्करला आणि डाटा एन्ट्री करणाऱ्या गटप्रवर्तकांना काम करूनही कोणताही मोबदला महापालिका किंवा जिल्हा परिषदेने दिला नाही. इतर जिल्ह्यात २०० ते ३५० रुपये प्रति रोज आशा वर्करला देण्यात येत आहेत. ५ ऑक्टोबरपासून योग्य निर्णय न घेतल्यास काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, पौर्णिमा पाटील, नंदा लिखार, रूपलता बोंबले, अंजू चोपडे, मनीषा बारस्कर, मंदा गंधारे उपस्थित होत्या.