नागपूर : अंतिम वर्षाच्या आॅनलाइन परीक्षांबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी हे त्यांच्या मोबाइलवरूनदेखील परीक्षा देऊ शकणार आहेत. यासाठी विद्यापीठाने आरटीएमएनयू परीक्षा हे विशेष मोबाइल अॅप विकसित केले आहे.
या माध्यमातून ते एक तासात सर्व प्रश्न सोडवू शकतील. विशेष म्हणजे राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. १ ते १८ आॅक्टोबर या कालावधीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा होणार आहे. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी गेली तरी विद्यार्थी पेपर सोडवू शकतील. केवळ पेपर सबमिट करताना इंटरनेट असणे आवश्यक राहणार आहे. एका तासानंतर पेपर सोडवू शकणार नाहीत.
विद्यापीठाने घेतली चाचणी : नागपूर विद्यापीठाने या मोबाइल अॅपची चाचणीदेखील घेतली आहे. चारही जिल्ह्यांतील दुर्गम भागातदेखील चाचपणी झाली व अॅप कमी इंटरनेट रेंजमध्येदेखील काम करू शकत असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडे माहिती येईल व त्यांची नावे शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.