नागपूर : खापरीत एलपीजी सिलिंडर भरलेल्या ट्रकची चोरी करण्यात आली. पोलिसांनी ट्रकमध्ये लावलेल्या जीपीएसच्या साहाय्याने आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.
कैलाश बाबुलाल राठोड ( ४९) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार भारत भास्कर हरडे (३५) फरार आहेत. दोघेही अमरावतीचे रहिवासी आहेत. न्यू सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी नितीन बेलखोडे यांच्याकडे ट्रक क्रमांक एम. एच. ३१, सी. बी.-७६५१ आहे. राजेंद्र अजित त्यांचा ट्रकचालक आहे. १९ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता राजेंद्रने एचपीसीएल येथून ४५० एलपीजी सिलिंडर घेतले. तो ट्रक खापरीमध्ये उभा करून कामानिमित्त निघून गेला. सिलिंडर एचपी डीलरच्या गोदामात पोहोचवायचे होते. अडीच तास झाल्यानंतर राजेंद्रला ट्रक चोरी झाल्याची माहिती मिळाली. राजेंद्रने याची माहिती आपले मालक नितीन बेलखोडे यांना दिली. बेलखोडे यांनी त्वरित बेलतरोडी ठाण्यात तक्रार दाखल केली. ४५० एलपीजी सिलिंडर असल्यामुळे पोलिसही सक्रिय झाले. जीपीएसच्या माध्यमातून त्यांना ट्रक अमरावतीकडे गेल्याची माहिती मिळाली. आरोपी लहान मार्गाने जात होते. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली. बेलतरोडी मार्गातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देऊन ट्रक पकडण्याचे आवाहन केले. हिंगणघाटजवळ पोलिसांनी ट्रक पकडला. पोलिसांना पाहून भारत हरडे फरार झाला. ट्रकचालक कैलाश राठोड पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून १३.५० लाख रुपये किमतीचे एलपीजी सिलिंडर तसेच ट्रक हस्तगत केला. कैलाशने भारतच्या सांगण्यानुसार ट्रक चोरी केल्याची माहिती दिली. भारतने ट्रक खरेदी करून देण्याच्या बहाण्याने आपणास नागपुरात आणले असल्याचे त्याने सांगितले. भारतला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होणार आहे.
नागपुरात एलपीजीने भरलेल्या ट्रकची केली चोरी
Date: