नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच त्यांचा माल थेट बांगलादेशमध्ये कमी वेळात पाठविता येणार आहे. विदर्भातून थेट बांगलादेशमध्ये माल नेता यावा यासाठी विशेष ‘किसान रेल’ सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला रेल्वे विभागाने मंजुरी दिली असून त्याचा रोडमॅप तयार करण्यात येईल. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक झाली.
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ मानण्यात येते. दरवर्षी सुमारे अडीच लाख टन संत्री बांगलादेशमध्ये निर्यात करण्यात येतात. विदर्भातून बांगलादेशपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी साधारणत: ७२ तास लागतात. तर रेल्वेमार्गाने हेच अंतर ३६ तासात पार करता येणे शक्य आहे. जर माल लवकर पोहोचला तर त्याची गुणवत्ता कायम राहील व वाहतुकीचा खर्चदेखील कमी होईल, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात रेल्वे विभागाला प्रस्ताव सादर केला होता.
१२ सप्टेंबर रोजी गडकरी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. संबंधित प्रस्तावाला रेल्वेने हिरवी झेंडी दाखविली असल्याची माहिती सोमेश कुमार यांनी या बैठकीत दिली.
२० बोग्यांची राहणार रेल्वे
ही विशेष रेल्वेगाडी २० बोग्यांची असेल व ४६० टन माल वाहून नेण्याची क्षमता असेल. वरुड, काटोल, नरखेड स्थानकांवरुन शेतकरी आपला माल या गाडीतून पाठवू शकतील. यासाठी विशेष संकेतस्थळ तयार करुन शेतकऱ्यांकडून आधीच बुकिंग घेण्याची सूचना गडकरी यांनी केली.