नागपूर : नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नागपूर व विभागातील रेल्वे स्थानकावर संत्रा विक्रीसाठी हक्काची जागा मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या संत्र्याच्या विक्रीसाठी जागा मिळावी, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली होती. त्यावर तात्काळ दखल घेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जागा देण्याचे मान्य केले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल व विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार व रेल्वे अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी रामटेक मतदार संघातील मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकावर असलेल्या विविध समस्या मांडल्या. नागपूर स्थानकावरून थेट दिल्लीसाठी रेल्वेगाडी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सांगून दिल्लीसह हावडा व गोरखपूर स्थानकापर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली. नागपूर वर्धा तिसऱ्या लाईनसाठी जमीन अधिग्रहणसंदर्भात येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात. बुटीबोरी रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांना थांबा द्यावा, कळमेश्वरसह काटोल व नरखेड व मोवाड येथेही थांबा द्यावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली.