नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे महाआघाडी सरकारचा कुंभकर्ण रुपी बडग्याचे दहन करण्यात आले. सहाही विधानसभा क्षेत्रात बडग्या मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या काळात लोक आर्थिक संकटातून जात असताना विजेच्या वाढीव बिलामुळे अधिकचा मार बसलेला आहे. पण हे सरकार पाझर न फुटणाऱ्या दगडाप्रमाणे ठप्प बसले आहे. म्हणून भाजपा युवा मोर्चाने कुंभकर्णाच्या निद्रावस्थेत असलेला सरकाररुपी बडग्या बनवला, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दक्षिण-पश्चिम नागपुरात प्रतापनगर चौक, दक्षिण नागपुरात छोटा ताजबाग चौक, पूर्व नागपुरातील छापरू नगर चौक, मध्य नागपुरातील बडकस चौक, पश्चिम नागपुरातील शंकरनगर चौक व उत्तर नागपुरातील कमाल चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांना आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार डॉ.मिलींद माने, किशोर पलांदुरकर, सुबोध आचार्य, श्रीकांत देशपांडे, संजय बंगाले, सुनील हिरणवार, अमर बागडे, शिवानी दाणी, प्रसाद मुजुमदार, कमलेश पांडे, प्रणय पाटणे, यश सातपुते,सारंग कदम, सचिन करारे, दीपांशु लिंगायत, आलोक पांडे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
बंदी असताना कसे निघाले बडगे?
‘भाजयुमो’तर्फे बडगे काढत असताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात आले नाही. शिवाय अनेक कार्यकर्ते बिना ‘मास्क’चे होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिरवणुकीची परवानगी पोलीस आणि प्रशासनाने नाकारली होती. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात आदेशदेखील दिले होते. सोबतच शहरात बडग्यांच्या मिरवणुका निघू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण ‘भाजयुमो’चे कार्यकर्ते नियम तोडून बडग्यांची मिरवणूक काढत असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर पोलिसांच्या डोळ्यादेखत बडगे काढण्यात आले.