नागपूर : शासकीय रुग्णालयांसोबतच आता कोविड- १९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोविड हॉस्पिटल बनले आहेत. या रुग्णालयात १८७६ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले होते.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व रुग्णालयांचे स्वतंत्र आदेश काढून या सर्व रुग्णालयांना कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता दिली आहे. या संपूर्ण रुग्णालयांतील १८७६ एकूण बेड्स पैकी २५६ बेडस् अतिदक्षता कक्षातील आहेत. ऑक्सिजनची उपलब्धता असलेली ९९७ तर ६२३ ऑक्सिजन नसलेले बेड्स आहेत. संपूर्ण रुग्णालय मिळून एकूण ९० व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे.
असे आहेत कोविड हॉस्पिटल
कोविड हॉस्पिटल म्हणून म्हणून मान्यता मिळालेल्यात ऑरेंज सिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, सावरकर चौक (१५० बेड्स), सेव्हन स्टार हॉस्पिटल, (१०५), श्री भवानी मल्टी स्पेशालिटी जगनाडे चौक अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पुनापूर (११०), गंगा केअर हॉस्पिटल, रामदासपेठ (१०५), श्री राधाकृष्ण हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पूर्व वर्धमान नगर (१५०), लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी (१५०), कुणाल हॉस्पिटल, मानकापूर (१००), होप हॉस्पिटल, टेका नाका (१००), सेंट्रल हॉस्पिटल, रामदासपेठ (५०), वोक्हार्ट हॉस्पिटल, गांधीनगर (४५), रेडिअन्स हॉस्पिटल वर्धमाननगर (६५), वोक्हार्ट हॉस्पिटल, नॉर्थ अंबाझरी रोड (११८), किंग्जवे हॉस्पिटल, कस्तूरचंद पार्क जवळ (२२८), अलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि.,मानकापूर (२००), न्यू एरा हॉस्पिटल, टेलिफोन एक्स्चेंज चौक (१००), व्हिम्स हॉस्पिटल (१००) या रुग्णालयांचा समावेश आहे.
हॉस्पिटलच्या जबाबदाऱ्या काय?
कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे, त्या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाप्रति काही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. अतिगंभीर असेल तर त्याला सर्वप्रथम उपचार देणे, आवश्यकता असेल तर व्हेंटिलेटरवर ठेवणे आणि त्या रुग्णाला स्टेबल करणे, हे त्या रुग्णालयाचे प्रथम कर्तव्य राहील. ज्या रुग्णांकडे थर्ड पार्टी विमा आहे, त्यांच्यावर उपचार करून क्लेमसाठी रुग्णालयानेच विमा कंपनींना पाठवावे. शासनाच्या परिपत्रकानुसार ८० टक्के बेड्स हे आरक्षित ठेवावे आणि त्यावर शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारावे.
केंद्रीय कॉल सेंटर
महापालिकेने आता कोविड कॉल सेंटरचा विस्तार करीत केंद्रीय कॉल सेंटर कार्यान्वित केले आहे. तुकाराम मुंढे यांनी बुधवारी या केंद्रीय कॉल सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई उपस्थित होते.
३४ कोविड चाचणी केंद्र
ज्या व्यक्तीला कोविड सदृश लक्षणे आहेत अथवा जे व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी तातडीने चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी मनपाने ३४ कोविड चाचणी केंद्राची व्यवस्था केली आहे. ६ कोविड चाचणी केंद्रावर आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था आहे. आर.टी.पी.सी.आर. चाचणी ज्या केंद्रांवर होते त्या केंद्रांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र (आर.पी.टी.एस.), लॉ कॉलेज वसतिगृह, रवि भवन, मॉरिस कॉलेज वसतिगृह, पाचपावली पोलीस वसाहत आणि राज नगर या केंद्रांचा समावेश आहे. येथे सकाळी १० ते २ या वेळेत चाचणी सुरू राहील. अन्य २८ केंद्रांमध्ये मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.