नागपूर : यावर्षी गणेश मंडळाला ४ फूट उंच मूर्तीची स्थापना करण्याचे नियम प्रशासनाने घालून दिल्याचा फटका मूर्तिकारांना बसला असून उलाढाल कमी झाली आहे. विविध सणांमध्ये नागपूर जिल्ह्यात सहा महिन्यात अर्थात मेपासून ऑक्टोबर अखेरपर्यंत जवळपास ५०० मूर्तिकारांचा एकत्रित व्यवसाय ५० कोटींचा असतो. पण यावर्षी जवळपास २० कोटींचीच उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका बसणार असल्याची शक्यता नामवंत मूर्तिकारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यातील सर्वाधिक फटका गणेशोत्सवात बसणार असल्याचे मूर्तिकार म्हणाले.
हिंदू धर्मात मूर्तीपूजेला महत्त्व आहे. सणांमध्ये मूर्ती घरी बसवून मनोभावे पूजा करण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. गेल्यावर्षीपर्यंत मूर्तीची उंची किती असावी, याचे बंधन नव्हते. पण यावर्षी कोरोनामुळे धार्मिक उत्सव थोडक्यात आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून साजरे करण्याचे बंधन आले आहे. एकूण उलाढालीपैकी ७० टक्के व्यवसाय गणेशोत्सवात होतो. याकरिता मूर्तिकार मेच्या पहिल्या आठवड्यापासून तयारी करतात. पण यावर्षी मनपाचे दिशानिर्देश पूर्वी न आल्याने सर्व गणेश मंडळांनी मूर्तींचे ऑर्डर दिले नाहीत. त्यामुळे यावर्षी जूनच्या अखेरीस मूर्ती तयार करण्यास सुरुवात झाली. नागपुरात जवळपास १५० ते २०० मोठे मंडळ ८ ते १० फूट उंच मूर्ती बसवितात. पण यावर्षी उंचीच्या बंधनाने अनेकांनी यावर्षी उत्सव साजरा न करण्याचे ठरविले आहेत. याशिवाय सार्वजनिक, सोसायट्यांमध्ये आणि घरी साजरा करणाऱ्या उत्सवातही गणेश मूर्तीची उंची कमी झाली आहे. यासोबत मूर्तिकारांना होणाºया मिळकतीवर ७० टक्के विपरीत परिणाम झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
रामनवमी, झुलेलाल शोभायात्रा आणि विविध समाजाच्या निघणाºया शोभायात्रांसाठी सजावटीची कामे मूर्तिकारांतर्फे करण्यात येतात. यंदा शोभायात्रा निघाल्याच नाहीच. तसेच गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शारदोत्सवात अर्ध्या फूटापासून १० ते १२ फूट उंच मूर्ती होतात. उंचीनुसार किंमत असते. या व्यवसायावर जवळपास कारागीर आणि हेल्पर असे एकूण ५ हजार जण अवलंबून आहेत. पण यंदा व्यवसायच नसल्याने मूर्तिकारांच्या अनेक मदतनिसांनी अन्य व्यवसाय निवडला आहे. गणेश विसर्जनातच कोरोनाचे विसर्जन होऊन मूर्तिकारांच्या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस यावेत, अशी अपेक्षा मूर्तिकारांनी व्यक्त केली.