नागपूर : ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शहरी भाग वगळता नागपूर जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावे तसेच सजावटदेखील जास्त आकर्षक ठेवू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट तर घरगुती गणपती २ फुटाच्या मर्यादेतील असावे. नागरिकांनी पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे.
गणेशोत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे, असेदेखील जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. गणेश दर्शनाची सुविधा आॅनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी, असेदेखील सार्वजनिक मंडळांना आवाहन करण्यात आले आहे.