नागपूर : कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक होउ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत:च स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. आज थोड्या अडचणी जाणवत असल्या तरी आपल्या भविष्यासाठी त्या अत्यंत गरजेच्या आहेत. ही जाणीव ठेवून स्वत:सह इतरांच्याही आरोग्याच्या दृष्टीने सर्व व्यापारी बांधव शनिवारी व रविवारी (२५ व २६ जुलै) स्वयंस्फूर्तीने काटेकोरपणे ‘जनता कर्फ्यू’चे पालन करणार आहेत, असा विश्वास सतरंजीपुरा झोन परिसरातील व्यापारी बांधवांनी महापौर संदीप जोशी यांना दिला.
कोरोना संदर्भात नागरिक आणि व्यापा-यांनी नियमांचे पालन करावे यासंदर्भात जनजागृतीसाठी महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी (ता.२४) सतरंजीपुरा झोन अंतर्गत बाजार परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गिरीश व्यास, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेविका आभा बिज्जु पांडे, नगरसेवक संजय महाजन, नगरसेवक संजय चावरे, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे, पोलिस निरीक्षक आर.एस.दुबे आदी उपस्थित होते.
कोव्हिड संदर्भातील शासनाच्या दिशानिर्देशाचे काटेकोर पालन करणे व ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत महापौर संदीप जोशी यांनी इतवारी बाजार परिसरातील वेगवेगळ्या व्यापारी संघटनांच्या पदाधिका-यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. मस्कासाथ येथील किराणा भवन येथे झालेल्या बैठकीत दी इतवारी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष रामदास वजानी, उपाध्यक्ष प्रकाश गोयल, गुलशन सानवानी, सचिव शिवप्रताप सिंग, कोषाध्यक्ष हरीश फुलावानी, सहसचिव प्रमोद सैलानी, नीलेश सूचक, अशोक वाधवानी, ऑईल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश ठक्कर, सचिव परमानंद मोतीयानी, चंदन गोस्वामी, राजेशभाई ठक्कर, होलसेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अजय मदान आदी उपस्थित होते.
प्रारंभी ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक बाजारामधील संपूर्ण परिस्थिती विषद केली. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक बाजारामध्ये नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी महापौरांकडे केली.
संपूर्ण देशात तब्बल दोन महिने लॉकडाउन असल्याने सर्वसामान्यांसह व्यापा-यांचेही मोठे हाल झाले. शहरात पुन्हा लॉकडाउन लागू केल्यास आणखी मोठा फटका बाजाराला बसणार आहे. मनपाद्वारे जारी केलेल्या सर्व नियमांचे व्यापारी संघटनांकडून पालन केले जाते. मात्र काही मोजक्या व्यापा-यांच्या बेजाबदारपणाचा फटका इतर सर्वच व्यापा-यांना बसत आहे. त्यामुळे मनपाने शासनाचे नियम आणि व्यापा-यांच्या अडचणी समजून सामंजस्याने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिका-यांनी केली.
लॉकडाउन हा कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याचा उपाय नाही. नागरिकांनी आपल्या सवयी बदलवून जबाबदारीने सर्व नियमांचे पालन करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. यासंदर्भात वारंवार आवाहनही करण्यात येत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. या बेजबाबदार वृत्तीमुळे आज शहरात लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र यापूर्वी आपल्या सवयी बदलण्याची शेवटची संधी म्हणून शहरात शनिवारी आणि रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन करण्यात येत आहे. या दोन दिवसानंतरही आपण सर्वांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, मास्क, सॅनिटायजरचा वापर आणि अन्य सर्व नियमांचे पालन करण्याची सवयी अंगिकारण्याची गरज आहे. ३१ जुलै पर्यंत आपल्या सर्वांच्या वागणुकीतून त्याचे परिणाम दिसून आल्यास लॉकडाउनची गरजच भासणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून हे ‘जनता कर्फ्यू’ पाळावे, असे आवाहन यावेळी महापौर संदीप जोशी यांनी केले. महापौरांच्या या आवाहनाला व्यापारी संघटनांच्या सर्व पदाधिका-यांनी समर्थन दर्शवून मनपाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा विश्वासही दिला.
अनेक दुकानांवर कारवाई
सतरंजीपुरा झोन अंतर्गत मारवाडी चौकातून महापौरांच्या जनजागृती दौ-याला सुरूवात झाली. मस्कासाथ इतवारी, नेहरूपुतळा चौक, शहिद चौक, गुड ओळी, अनाज बाजार आदी सर्व भागात फिरून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. शहिद चौकातील रुक्मिणी जनरल स्टोर्स, अनाज बाजारातील दादुमल मोटुमल रिटेल शॉप, बजरंग ट्रेडर्स या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येताच महापौरांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले व संबंधित दुकानांवर नियमानुसार कारवाई करण्याचेही निर्देश दिले. महापौरांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाद्वारे संबंधित सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
याशिवाय दुकानांमध्ये, रस्त्यावरून जाणा-या ज्यांच्याकडे मास्क नसल्याचे दिसून आले त्यांना महापौर संदीप जोशी यांनी स्वत: मास्क दिले व नियमीत मास्क लावण्याचेही बजावले.