भारतीय नौदलाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या समुद्र सेतू अभियान अंतर्गत आयएनएस जलाश्वने आज इराणमधल्या 687 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात आले. इराणमधल्या बंदर अब्बास येथून निघालेले हे जहाज आज (दि.1 जुलै, 2020 रोजी ) सकाळी तुतिकोरीन बंदरामध्ये दाखल झाले. भारतीय नौदलाच्या जहाजांनी इराणमधून आत्तापर्यंत 920 भारतीय नागरिकांना आणले आहे.
इराणमधल्या भारतीय मिशनच्यावतीने भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्यासंबंधीची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. जलप्रवासाला जाण्यापूर्वी सर्वांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. तसेच कोविड-19चा होत असलेला प्रसार लक्षात घेवून शारीरिक अंतर राखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
तुतिकोरीन बंदरातल्या स्थानिक अधिकारी वर्गाने आलेल्या प्रवाशांची स्थानांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून, आरोग्य तपासणीनंतर त्यांच्या मूळ स्थानी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था केली.
संपूर्ण जगभरामध्ये कोविड-19 चा झालेला प्रसार लक्षात घेवून जे मायदेशी येवू इच्छितात अशा 3992 भारतीय नागरिकांना नौदलाच्या समुद्र सेतू अभियान अंतर्गत आत्तापर्यंत मायदेशी आणण्यात आले आहे. महामारीच्या काळामध्ये हे भारतीय नागरिक मालदिव, श्रीलंका आणि इराणमध्ये वास्तव्य करीत होते.