मुंबई : दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाची संख्या थोडी कमी झाल्याचं आज दिसलं. गेले सात दिवस दररोज किमान 3700 ते 4000 दरम्यान रुग्णवाढ होत होती. ती आज 3214 वर आली. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर देशाच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. गेल्या 48 तासांत 75 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 173 असे 248 कोरोना मृत्यू आज राज्यात नोंदले गेले. 1925 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटसुद्धा थोडासा सुधारला आहे.
देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 3.36 आहे. तोही गेल्याच आठवड्यात 2.8 वरून वाढून एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.69 झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 1,39,010 रुग्ण कोविड पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 62,833 आहे. आतापर्यंत 69,631 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.
बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ कायम आहे. सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रुग्णवाढीचा दर कमी झाल्याची नोंद दिसते.
16 जूनच्या आठवड्यात रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 3 टक्क्यांवर आला आहे. तो 31 मे च्या आठवड्यात 4 टक्के होता. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असली, तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने ही आकडेवारी समोर दिसत आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 50.09 टक्के
मृत्यूदर – 4.69 टक्के
सध्या राज्यात 6,05,141 लोक होम क्वारंटाइन आहेत. 26,572 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 30 हून अधिक दिवसांवर गेला आहे.
Also Read- कोरोनावर गुणकारी औषध शोधणाऱ्या ‘पतंजली आयुर्वेदीक’ला आयुष मंत्रालयाची नोटीस