मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी HSC म्हणजेच बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली.
निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण यमंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली.
सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी निकालांची ताऱीख समोर आली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यायंवर चर्चा झाल्याचं कळत आहे. ज्यामध्ये सद्यपरिस्थिती पाहता ऑनलाइन शिक्षण, दहावी, बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्दय़ांवर प्रकाश टाकण्यात आला.
लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मार्ग खुला होणार…
प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही दहावी आणि बारावीच्या परीक्षेला यंदाच्या वर्षी लाखो विद्यार्थ्यी बसले होते. ज्यांच्या भवितव्याचा मार्ग निकालानंतर खुला होणार आहे. शालेय माध्यमिक अर्थात दहावीच्या परीक्षेला यंदा १७ लाख ६५ हजार ८९८ आणि बारावीच्या परीक्षेला यंदा १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते. ज्यांचा निकाल शिक्षण मंळातर्फे जाहीर केला जाणार आहे.
अकरावीचे प्रवेश कधी?
जुलै महिन्याच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळं अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी त्यानंतरच्या काही दिवसांतच महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया सुरु होईल. ज्याअंतर्गत महाविद्यालयांची नोंदणी सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनंच ही प्रक्रिया पार पडणार असल्याचं कळत आहे.
दरम्यान, सध्याच्या घडीला निकालाच्या तारखांची अधिकृत माहिती समोर आल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शिवाय आता त्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे निकाल हाती येण्याची.